Pune : मानवप्रजाती नष्ट करण्यास मानवच जबाबदार ठरेल -डॉ. एस. एफ. पाटील

'मविप' व इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सतर्फे वैज्ञानिक कट्टा

एमपीसी न्यूज- “मानवाकडून पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि मोठ्या प्रमाणात वाढलेले औद्योगिकरण यामुळे प्रदूषण वाढत आहे. या प्रदूषणामुळे जगातील अनेक विविध प्रजाती नष्ट होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आपण वेळीच नियंत्रण मिळवले नाही, तर मानव प्रजातीही नष्ट होईल आणि त्यासाठी स्वतः मानवच जबाबदार ठरेल,’ असे मत जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि पर्यावरण अभ्यासक डॉ. एस. एफ. पाटील यांनी केले आहे.

मराठी विज्ञान परिषद, दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स आणि प्रा. डॉ. एच. जे अर्णीकर ट्रस्टच्या वतीने अणूरसायन शास्त्रज्ञ प्रा. डॉ. एच. जे. अर्णीकर स्मृतीनिमित्त वैज्ञानिक कट्टा अंतर्गत ‘पर्यावरण आणि प्रदूषण’ या विषयावर डॉ. एस. एफ पाटील बोलत होते. शिवाजीनगर येथील दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सच्या फिरोदिया सभागृहात झालेल्या या कट्टयावेळी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ,  विनय र र, डॉ. नीलिमा राजूरकर, संजय मा. क. आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. एस. एफ. पाटील म्हणाले, “आज जगामध्ये ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण यासह इतर अनेक प्रकारचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत असून, मानवाने याच्यावरती कुठेतरी नियंत्रण मिळवले पाहिजे. वाढती लोकसंख्याही याला कारणीभूत आहे. येणाऱ्या शतकापर्यंत जगाची लोकसंख्या चौदाशे कोटीपर्यंत पोहोचेल. तेव्हा हाहाकार माजलेला असेल. त्यामुळे वेळीच
नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. दरवर्षीमध्ये मानवाच्या विकासामुळे दहा हजार विविध प्रजाती नष्ट होत आहेत, त्यामुळे जगाची वाटचाल विनाशाकडे चालू आहे. न्यूक्लिअर एनर्जीचा वापर करून प्रदूषण टाळता येऊ शकणार आहे. त्याचा वापर
करून भविष्यात आपल्याला प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल.”

सूत्रसंचालन डॉ. नीलिमा राजूरकर यांनी केले. आभार राजेंद्रकुमार सराफ यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.