Pimpri : दिवसाआड पाण्याची मागणी आणि दोनाचे चार हात !
महापालिका सभेत माजी महापौरांना माजी उपमहापौरांचा टोला
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरुन गेल्या दोन तासांपासून महासभेत चर्चा सुरू आहे. जादा दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा, अशी विनंती भाजपचे माजी महापौर नितीन काळजे यांनी केली. त्याला माजी उपमहापौर व भाजपच्या नगरसेविका उषा ढोरे यांनी आक्षेप घेतला. त्यांचे दोनाचे चार हात झाले नाहीत. त्यामुळे त्यांना पाण्याचे जास्त महत्व वाटत नाही अशी कोटी केली. त्यावरून सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. त्यामुळे महासभेतील गंभीर वातावरण हलकेफुलके झाले.
महापालिकेची ऑक्टोबर महिन्याची सर्वसाधारण सभा आज (शनिवारी) सुरू आहे. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून गेल्या तीन तासापासून चर्चा सुरू आहे.
माजी महापौर नितीन काळजे म्हणाले, शहरात पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. अनेक भागात अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा. त्यामुळे नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होईल.
त्यानंतर बोलण्यासाठी उभे राहिलेल्या माजी उपमहापौर उषा ढोरे म्हणाल्या, एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे चुकीचे आहे. त्याला आमचा तीव्र विरोध आहे. काळजे यांचे दोनाचे चार हात झाले नाहीत. त्यामुळे त्यांना पाण्याचे जास्त महत्व वाटत नाही, अशी कोटी त्यांनी केली. त्यावरून सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.