Pune News : फरार रवींद्र बऱ्हाटेच्या घरावर टाकलेल्या छाप्यात शेकडो कागदपत्रे हाती

राजकारण्यांपासून ते बिल्डरांच्या फाइल्स सापडल्या

एमपीसी न्यूज : माहिती अधिकार कार्यकर्ता आणि सध्या मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेला रवींद्र बऱ्हाटेशी संबंधित असणार्‍यांवर पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी छापा टाकला होता. या छाप्यादरम्यान पोलिसांना शेकडो फाइल्स सापडल्या आहेत. या फाइल्स राजकारणी व्यक्ती, बांधकाम व्यावसायिक,  हॉटेल व्यावसायिक, शासकीय ठेकेदार यांच्याशी संबंधित आहेत. याशिवाय कुलमुखत्यार पत्रे, खरेदीपत्र, करारनामे, भागीदारी पत्रे आणि इतर दस्तऐवजाचा समावेश आहे. 

रवींद्र बऱ्हाटे  आणि त्याच्या साथीदाराला विरोधात पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आठपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये त्याच्याविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून रवींद्र बऱ्हाटे हा फरार झाला आहे. कोथरूड पोलिसांनी त्याच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट काढले आहे.

रवींद्र बऱ्हाटेसह त्याच्या नातेवाईकांच्या घरावर पोलिसांनी एकाच वेळी छापा टाकला. लुल्लानगर कोंढवा येथील मधुसुधा अपार्टमेंट, धनकवडीतील सरगम सोसायटीत असणारा रायरी बंगला, रवींद्र बऱ्हाटेची मुलगी चालवीत असलेले फार्मास्युसिटीकल शॉप, बऱ्हाटेच्या मुलीच्या सासर्‍याचे धनकवडी येथील घर, बऱ्हाटेच्या बहिणीचे मुकुंदनगर येथील घर, बऱ्हाटेच्या मेव्हण्याचे एरंडवणा येथील घर, बिबेवाडी मार्केट यार्ड येथील घर या सर्व ठिकाणी पोलिसांनी एकाच वेळी छापा टाकला, परंतु तो या ठिकाणी सापडला नाही.

सरगम सोसायटीतील रायरी बंगल्याच्या झडती मध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात कागदपत्रे सापडली. यामध्ये माहिती अधिकारात केलेले अर्ज, माहिती अधिकारात प्राप्त झालेली माहिती, पुणे आणि मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक अशी संबंधित असलेली कागदपत्रे, शासकीय ठेकेदाराची संबंधित असलेली कागदपत्रे, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग, इन्कम टॅक्स कार्यालय, तहसील कार्यालय यांच्याशी केलेला पत्रव्यवहार, वेगवेगळ्या राजकीय व्यक्तीशी संबंधित असलेले कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.