Cyclone Nisarga : चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ‘गुलाबी थंडी’ पडणार!

एमपीसी न्यूज : देशाच्या दक्षिणेकडील समुद्रात वादळामागुन साखळी सुरूच आहे. गेल्या दोन आठवड्यात आलेल्या ‘गती’ आणि ‘निवार’ वादळांपाठोपाठ श्रीलंकेच्या पूर्वेकडील बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे.

मंगळवारी (ता.1) या भागात चक्रीवादळाचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. या वादळाच्या प्रभावामुळे उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येऊन राज्याच्या किमान तापमानात 2 ते 3 अंशाची घट होऊन गुलाबी थंडी पडण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात तयार झालेले ‘गती’ चक्रीवादळ सोमालियाकडे सरकून रास बिन्नाहजवळ निवळून गेले. ‘गती’ तीव्र चक्रीवादळ निवळतेय तोच बंगालच्या उपसागरात मंगळवारी (ता. 24) आलेल्या ‘निवार’ चक्रीवादळाने तमिळनाडू, आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याला तडखा दिला. जमीनीवर येताच हे वादळ आंध्रप्रदेशमध्ये विरून गेले.

दरम्यान विषुवृत्ताजवळील हिंद महासागर आणि दक्षिण अंदमान समुद्रालगत समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली. रविवारपर्यंत (ता.29) या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. सोमवारी (ता.30) दुपारी श्रीलंकेच्या त्रिंकोमलीपासून 710 तर तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून 1220 किलोमीटर पुर्वेकडे हे क्षेत्र सक्रीय होते.

ही वादळी प्रणाली आणखी तीव्र होऊन मंगळवारी (ता.1) चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. बुधवारी (ता.2) सायंकाळपर्यंत हे चक्रीवादळ श्रीलंका देशाची भूमी ओलांडून तामिळनाडूच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे तमिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश राज्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ही प्रणाली अरबी समुद्राच्या कोमोरीन भागाकडे येणार आहे. त्या पाठोपाठ दक्षिण अंदमान समुद्रात पुन्हा नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.