Pune News : साडूच्या मदतीने पत्नीकडून गळा आवळून पतीचा खून, पुण्यातील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज : पुण्याच्या मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीनेच साडूच्या मदतीने गळा आवळून खून केला. त्यानंतर दुसर्‍याच एका व्यक्तीने मारहाण करून खून केल्याचा आरोप केला. परंतु पोलिसांनी तपासात त्या महिलेचा हा बनाव हाणून पाडला आणि खून करणाऱ्या दोघांना अटक केली. मुंढव्यातील केशव नगर येथील गुरुकृपा सोसायटीत रविवारी ही घटना घडली. 

कप्तानसिंग नायक (वय 37) असे खून झालेल्याचे व्यक्तीचे नाव आहे. पत्नी अंजली कप्तानसिंग नायक उर्फ चव्हाण (वय 32) आणि साडू गजेंदर चित्तरसिंग नायक (36) या दोघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की काही वर्षांपूर्वी कप्तान सिंग आणि अंजली यांचा विवाह झाला होता. कप्तान सिंग दिल्लीचा तर अंजली ही सोलापूरची रहिवासी आहे. लग्नानंतर कप्तान सिंग याने दारू पिऊन पत्नीला मारहाण करणे सुरू केले. मागील अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू होता. रविवारी देखील तो दारू पिऊन आला.

त्याच्या या रोजच्या कृत्याला कंटाळलेल्या अंजली हिने त्याला ठार मारण्याचा कट रचला. त्यानंतर आरोपी गजेन्दर नायक याच्या मदतीने गळा आवळून त्याचा खून केला. काही वेळाने तो झोपेतून उठत नसल्याचे   शेजारपाजारच्यांना सांगितले. त्यानंतर त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. परंतु तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.

माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. सुरुवातीला आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत आरोपींनी खून केल्याचे उघडकीस आणले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.