IPL 2020 : हैदराबादचा मुंबईवर 10 गडी राखून विजय 

एमपीसी न्यूज – आयपीएल च्या शेवटच्या साखळी सामन्यात हैदराबादने मुंबईवर 10 गडी राखून विजय मिळवला या विजयामुळे हैदराबादने ‘प्ले-ऑफ’मध्ये आपली जागा निश्चित केली आहे. मुंबईने दिलेल्या 149 धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरने नाबाद 85 तर वृद्धिमान साहाची नाबाद 58 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. 

हैदराबादच्या सलामीवीरांची डावाची आक्रमक सुरूवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा या दोघांनी पॉवर-प्लेच्या षटकांत अर्धशतकी भागीदारी केली. त्यांनी 6 षटकात 56 धावा केल्या. डावाच्या बाराव्या षटकात फिरकीपटू राहुल चहरच्या पहिल्याच चेंडूवर वॉर्नरने षटकार लगावत आपलं अर्धशतक साकारलं. तर त्याच षटकात चौथ्या चेंडूवर साहाने एकेरी धाव अर्धशतक केलं. त्यानंतर वॉर्नरने धावगती वाढवत धमाकेदार नाबाद 85 धावांची खेळी केली. त्याने 10 चौकार आणि 1 षटकार लगावला. वृद्धिमान साहानेही 7 चौकार आणि 1 षटकार लगावत नाबाद 58 धावा केल्या आणि त्याला चांगली साथ दिली.

नाणेफेक जिंकून हैदराबादने मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. दुखापतीनंतर संघात परतलेला कर्णधार रोहित शर्मा 4 धावांवर तर क्विंटन डी कॉक 25 धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव (36) आणि इशान किशन (33) यांनी चांगली खेळी केली, पण मोठी धावसंख्या उभारण्यात ते अपयशी ठरले. कृणाल पांड्या (0) आणि सौरभ तिवारीही (1) झटपट माघारी परतले. अखेर शेवटच्या टप्प्यात कायरन पोलार्डने 2 चौकार आणि 4 षटकार खेचत 41 धावा केल्या आणि संघाला 149 पर्यंत मजल मारून दिली. हैदराबादकडून संदीपने 3, होल्डर-नदीमने 2-2 आणि राशिदने 1 बळी घेतला.

* पहिल्या ‘प्ले-ऑफ’ सामन्यातील विजेता थेट अंतिम फेरीत

‘प्ले-ऑफ’मध्ये गुरूवारी मुंबई विरूद्ध दिल्ली तर शुक्रवारी हैदराबाद विरूद्ध बंगळुरू असे सामने रंगणार आहेत. पहिल्या सामन्यातील विजेता थेट अंतिम फेरीत जाईल. तर पहिल्या सामन्यातील पराभूत संघ दुसऱ्या सामन्यातील विजेत्याशी खेळेल. त्यातून अंतिम फेरीतील दुसरा संघ निवडला जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.