IPL 2021 : आव्हान संपलेल्या हैदराबादने राजस्थानची वाट केली बिकट! सात गडी राखून मिळवला मोठा विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – आयपीएलची आजच्या 40 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. परंतु, त्यांची सुरुवात आजही खराब झाली. लेविस केवळ चार धावा करुन भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्या जागी कर्णधार संजू आला, त्याने यशस्वी जयस्वालच्या साथीने सुंदर फलंदाजी करत दुसऱ्या गड्याच्या भागीदारीसाठी 56 धावांची भागीदारी रचली. दरम्यान, हैदराबाद संघाच्या आव्हानापुढे राजस्थान रॉयल्सला जाताच आले नाही. त्यामुळे सात गडी आणि नऊ चेंडु राखून हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्सवर वरचढ होत विजयाला गवसणी घातली आहे.

संजू आणि जैस्वाल चांगले खेळत आहेत असे वाटत असतानाच जैस्वाल संदीप शर्माच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला. त्याने 23 चेंडूत वेगवान 36 धावा काढल्या. त्याच्या जागी आलेला लिविंगवुड मात्र आज काहीही खास करू शकला नाही आणि वैयक्तिक चार धावांवर असताना रशीद खानचा बळी ठरला.तीन बाद 77 अशी काहीशी कठीण अवस्था झालेली असताना कर्णधार संजू मात्र आज भरात होता. त्याला साथ द्यायला महिपाल लोमरोर आला, दोघांनीही परिस्थितीला साजेशी फलंदाजी करत चौथ्या गड्यासाठी 84 धावांची उपयुक्त भागीदारी केली.

19व्या षटकात भुवीने सुंदर गोलंदाजी करताना जमलेल्या भागीदारीला चाप लावला, ज्याच्या दडपणाचा फायदा सिद्धार्थ कौलने घेत शेवटच्या षटकात संजूला बाद करत राजस्थान रॉयल्सला कमीत कमी धावांत रोखून धरले. साहजिकच, नवीन फलंदाज अखेरच्या काही चेंडुवर धावा काढू शकले नाहीत परिणामी निर्धारित 20 षटकात राजस्थान रॉयल्सच्या 164 च धावा झाल्या.

दरम्यान, संजू सॅमसनने केवळ 53 चेंडूत 82 धावा करत आज चांगली फलंदाजी करत आपल्या कर्णधारपदाला न्याय देणारी खेळी केली, पण एकंदरीत हैदराबादच्या किफायतशीर गोलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सला मोठीं धावसंख्येकडे जाताच आले नाही. हैदराबाद संघाचे आव्हान या स्पर्धेत फारसे उरलेले नसल्याने त्यांच्यावर कसलेही दडपून नव्हते,कदाचित यामुळेच त्यांना आज मोकळे खेळता आले.

जेसन रॉय आणि वृद्धीमान साहाने अतिशय आक्रमक फलंदाजी करत केवळ 5 षटकातच अर्धशतकी सलामी दिली. साहा आज फारच आक्रमक झाला होता, त्याने 11 चेंडूत 18 धावा केल्या,पण याच आक्रमकतेच्या नादात तो सॅमसनद्वारे महिपाल लोमरोरच्या गोलंदाजीवर यष्टीचित झाला. त्यानंतर कर्णधार केन विल्लीयसमने जेसन रॉयच्या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 57 धावांचीच भागीदारी केल्यानंतर जेसन 60धावा काढून साकरियाचा बळी ठरला.

पाठोपाठ प्रियम गर्ग सुद्धा भोपळा फोडता बाद झाला,पण कर्णधार केन विल्लीईम्सने अभिषेक शर्माच्या साथीने कसलेही दडपून न घेता सुंदर फलंदाजी करत संघाला विजयी केले. सात गडी आणि 9 चेंडु राखून हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला.

खरं तर हैदराबाद संघाचे आव्हान आयपीएल 2021मधून जवळपास संपल्यातच जमा आहे,पण आज त्यांच्या या विजयाने राजस्थान रॉयल्सला सुद्धा नुकसान होऊ शकते, ही केवळ शक्यता आहे की सत्य ते येत्या काही दिवसांतच कळेल. जेसन रॉयला धडाकेबाज खेळीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.