Pune : हायपरलूप प्रकल्प सध्या तरी शक्य नाही – अजित पवार

एमपीसी न्यूज – हायपरलूपचा प्रकल्प अद्याप जगात कुठेही झालेला नाही. हा प्रकल्प आधी कुठेतरी 10 किमी तरी होऊ द्या. जर तिकडे यशस्वी झाला तर आपल्याकडे त्याची ट्रायल घेता येईल, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रकल्प सध्यातरी शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध विकासकामांचा अजित पवार यांनी आज आढावा घेतला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हायपरलूप ट्यूबची एक सीरिज असते. त्यात अनेक पॉड्स असतात. त्यातून एअरलेस प्रवास करणं शक्य होतं. ही हायपरलूप ट्यूब सर्वसाधारण एक्सप्रेस आणि बुलेट ट्रेनपेक्षाही अतिवेगाने धावते. युती सरकारच्या काळातील हा महत्वाकांक्षी प्रकल्प होता. याचा वेग ताशी 1220 किमी इतका असतो. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर अवघ्या 23 मिनिटांत पार करता येणार होते. फडणवीस सरकारने त्याची घोषणा केली होती.

अमेरिकेतील लास वेगास येथे सर्वप्रथम हायपरलूप वनची चाचणी घेण्याचे प्रस्तावित होते. त्याचप्रमाणे भारतात या हायपरलूप प्रकल्पातील पहिला टप्पा पीएमआरडीए प्राधिकरणाच्या गहुंजे ते उस्से गावापर्यंत उभारण्यात येऊन त्याची चाचणी घेण्यात येणार होती. दुबईतील एक कंपनी या प्रकल्पासाठी दुबईतील एक कंपनी भारतात गुंतवणूक करणार होती. हा प्रकल्प यशस्वी झाला असता तातडीने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते वाकड (पुणे) दरम्यान हा हायपरलूप उभारण्यात येणार होता. आगामी सहा ते आठ वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन होते.

मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आता या प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. याबाबत आजच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांना विचारले असता सध्या तरी हा प्रकल्प शक्य नाही, पवार यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.