मी आहे राष्ट्राची संपत्ती!

एमपीसी न्यूज – मंडळी लॉकडाऊन चे तिसरे पर्व अता सुरू होत आहे. सगळ्यांना चिंता भासून राहिली आहे हे लॉकडाऊन केव्हा उघडणार , केव्हा सगळ्या गोष्टी सुरळीत सुरू होणार, केव्हा मी घरी जाणार , केव्हा माझं नित्योपक्रम सुरू होणार? देशावर केवढं मोठं आर्थिक संकट कोसळणार, ह्या आर्थिक संकटातून कसं बाहेर निघायचं वगैरे वगैरे…..

हे आणि असे अनेक प्रश्न बऱ्याच लोकांना त्रास देत आहेत. बरं अत्यावश्यक गोष्टी तर सर्व उपलब्ध आहेत. म्हणजे जर माणूस फक्त अत्यावश्यक गोष्टी घेतो तर जग आर्थिक संकटात येतं, म्हणजे जगाचा कारभार हा अनावश्यक गोष्टीवर जास्त अवलंबून आहे का, असा प्रश्न सुद्धा निर्माण होऊ शकतो. असो..

पण एकूणच बघा ना अत्यावश्यक म्हणून लोकं दुकानात गर्दी करून काय आणतात तर मॅगी, चीझ, टोमॅटो सॉस… लोकांची अत्यावश्यक गोष्टींची  संकल्पना पण फार मजेदार आहे. एकूणच माणसाची जशी संकल्पना असते तसाच तो वागत असतो.

मी कायम म्हणत असतो माणूस हा फक्त त्यांनी केलेल्या व्याख्यांचा समूह आहे. त्याची चांगल्याची जी व्याख्या आहे तसा तो चांगलं वागत असतो. अर्थातच प्रत्येकाची ही व्याख्या वेगळी असते. जशी एखाद्याची व्याख्या तसं त्याचं वागणं.

मी बऱ्याच वेळा लोकांशी संवाद साधत असताना त्यांना विचारतो तुम्ही तुमची ओळख कशी करून द्याल.. तर ते त्यांची ओळख त्यांचे नाव, शिक्षण, नोकरी किंवा काय काम करतात एवढी मर्यादित ओळख करून देतात. पण आपण असं का नाही सांगत की, मी राष्ट्राची संपत्ती आहे!

आपली खरी ओळखच कोणी आपल्याला करून दिली नाही आणि म्हणूनच बऱ्याच वेळा आपण स्वतःला कमी लेखत असतो. आपल्या मध्ये ही जाणीव निर्माण होणे ही गरज आहे. मी कोणी साधा सुधा माणूस नाही तर  सध्याच्या ह्या संकटात मी राष्ट्राच्या सैन्याचा एक घटक आहे आणि मी ह्या राष्ट्राची संपत्ती आहे. आपल्या राष्ट्राची खरी संपत्ती राष्ट्राचे नागरिकच आहेत.

ह्या लॉकडाऊन मुळे देशाचे खूप मोठे नुकसान झालं आहे आणि आणखी होईल असं बोललं जात आहे. पण ह्या देशाची खरी संपत्ती तर देशाचे नागरिकच आहेत, आणि ही जर संपत्ती वाचली तर हा एकशे तेहतीस कोटी लोकसंख्या चा देश एकत्र येऊन केवढी तरी संपत्ती पुन्हा निर्माण  करू शकतात. झालेलं नुकसान सहज भरून काढू शकतात यात काहीच शंका नाही.

आपण सगळ्यांनी मिळून एक शपथ घेणे आवश्यक आहे.ती म्हणजे, ‘मी राष्ट्राची संपत्ती आहे. राष्ट्राच्या संपत्तीची काळजी घेणे माझे प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी मी रोज व्यायाम करीन. माझा व्यायाम हे राष्ट्र निर्मिती साठी एक पाऊल आहे’

आपल्याला समृध्द आणि समर्थ भारत निर्माण करायचा आसेल तर ह्या लॉक डाऊन चा उपयोग आपण आपले सामर्थ्य वाढवण्यासाठी करूया.

तर मंडळी आपल्याला जर कोणी विचारलं की तुम्ही कोण तर पहिला विचार आपल्या मनात आला पाहिजे, ‘मी राष्ट्राची संपत्ती आहे’!

– डॉ. राजीव नगरकर

आयुर्वेदाचार्य, मानस शात्रज्ञ

मनाची व्यायामशाळा

9921951588

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.