Pune News : मला एका विद्यापीठाच्या बाजूला बसण्याची संधी मिळाली – आदित्य ठाकरे  

एमपीसी न्यूज – शरद पवारांच्या निमित्ताने मला एका विद्यापीठाच्या बाजूला बसण्याची संधी मिळाली अशी भावना राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज पुण्यात व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज पुण्यात अमनोरा पार्क येथे छत्रभुज नरसी आंतरराष्ट्रीय स्कूलच्या भूमिपूजन समारंभास उपस्थित होते. त्यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. 

आदित्य ठाकरे यावेळी बोलताना असे म्हणाले,

सध्याच्या आव्हानात्मक काळात मागील आठ महिन्यात पहिल्यांदाच मी कोविड सेंटर सोडून इतर कोणत्या वेगळ्या गोष्टीच्या उद्घाटनाला आलो आहे. त्यातही तुम्ही तर आज मला एका विद्यापीठाच्या बाजूला बसवलं आहे ते म्हणजे शरद पवार. त्यांना ज्यावेळी भेटतो, तेव्हा प्रत्येक वेळी काही ना काही शिकण्यास मिळतं.

प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा अधिकार आहे. मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अधिकार असावा, या संकल्पनेवर काम करणं महत्त्वाचं आहे. नव्या महाराष्ट्राचे स्वप्न पाहत असताना केवळ रट्टा मारत पूर्ण केलेले शिक्षण नव्हे, तर मुलांमधील उत्सुकतेला योग्य मार्ग उपलब्ध करून देत त्यांच्या नवसंकल्पनांना व्यासपीठ देणे आम्ही गरजेचे मानतो. भविष्यात अशीच शिक्षण व्यवस्था उभारण्यावर आमचा भर राहणार असल्याचं मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.