Pune : मला कात्रजप्रमाणे सर्वांगीण सुंदर हडपसर मतदारसंघ करायचा – वसंत मोरे

एमपीसी न्यूज – हडपसर मतदारसंघ म्हटले की, कचरा, पाणी, वाहतूक ही समस्या नित्याचीच आली. मला हे चित्र बदलायचे आहे. ज्याप्रमाणे मी कात्रज परिसराचा विकास केला. त्याचप्रमाणे सर्वांगीण सुंदर हडपसर मतदारसंघाचा विकास करणार असल्याचा निर्धार मनसेचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोरे यांच्याशी ‘एमपीसी न्यूज’च्या प्रतिनिधीने सवांद साधला. हडपसरच्या विकासाचे मॉडेल आपल्याकडे तयार आहे, असेही त्यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

 

प्रश्न : प्रचारात फिरत असताना मनसेला वातावरण कसे आहे?
उत्तर : मागील 1 महिन्यापासून आम्ही या मतदारसंघात धुमधडाक्यात प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी उमेदवाराच्या पायाखालची वाळू घसरली आहे. आम्ही रोज 8 तास या मतदारसंघात पायी फिरलो. घराघरांत प्रचार केला. हजारोंच्या संख्येने नागरिक आमच्या पदयात्रेत सहभागी झाले होते. त्यामुळे मनसेचा विजय निश्चित आहे.
प्रश्न : राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचा किती परिणाम होणार?
उत्तर : आमच्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेमुळे मला चांगला फायदा होणार आहे. बंटर हायस्कूल हडपसर येथील सभेला हजारो नागरिकांची गर्दी होती. ही गर्दी काही पैसे देऊन आणली नव्हती. राजसाहेब यांच्या प्रेमापोटी ही जनता आली होती. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष हवा आहे. त्यासाठी मनसेला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हडपसरमध्ये वाहतूककोंडी ही मोठी समस्या आहे, ती कशी सोडविणार?
उत्तर : खरं आहे, हडपसर मतदारसंघांत वाहतूककोंडी ही गंभीर समस्या आहे. मोठया रस्त्यांना पर्यायी रस्तेच नाही. महंमदवाडी पासून सर्वच परिसरात वाहतूककोंडी होते. तासनतास नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्याकडे स्थानिक आमदार आणि राष्ट्रवादीने लक्षच दिले नाही. आपण आमदार झाल्यावर हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहे.

प्रश्न : संपूर्ण शहराचा कचरा याच मतदारसंघात टाकला जातो, काय सांगाल?
उत्तर : पुणे शहराच्या चारही बाजूंनी कचरा जिरविला जावा, अशी मागणी मी वारंवार पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. कात्रज भागात कचरा समस्या सोडविल्याने ‘आयएसओ’ प्राप्त केले. या भागातील कचरा समस्या सोडविण्याचे नियोजन आपल्याकडे आहे.
प्रश्न : आपले निवडणुकीत काय मुद्दे आहेत?
उत्तर : विकास हाच माझा निवडणुकीचा मुद्दा आहे. भाजप आमदाराकडून 7 हजार कोटी रुपयांची विकासकामे केल्याचा दावा करण्यात येत आहे. आम्ही महिनाभर दुर्बीण लावून या मतदारसंघात फिरलो. पण, भाजपचा विकास काही सापडला नाही.

प्रश्न : राष्ट्रवादीने आपल्याला पाठिंबा का नाही दिला?
उत्तर : लोकसभा निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. स्वतः अजित पवार यांनीही आपली कात्रज भागात मोठी ताकद आहे, त्यामुळे कोल्हे यांना साथ देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आम्ही प्रामाणिकपणे राष्ट्रवादीचे काम केले. पण, त्यांनी मन मोठे करून मला पाठिंबा दिला नाही.

प्रश्न : कोंढवा, मुंढवा, मांजरी भागांत प्रचाराला कसा प्रतिसाद आहे?
उत्तर : कोंढवा भागात आमच्या पक्षाचे नागरसेवक साईनाथ बाबर यांनी चांगले काम केले. त्यामुळे मला कोंढवा, मुंढवा, मांजरी, साडेसतरानळी, केशवनगर, महमदवाडी, महादेवनगर भागांतून चांगली मते मिळणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.