Pimpri: ‘सफाई कर्मचा-यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास खपवून घेणार नाही’

नगरसेवक विकास डोळस यांनी अधिका-यांना घेतले फैलावर

एमपीसी न्यूज – शहर स्वच्छ ठेवणा-या सफाई कर्मचा-यांच्या समस्यांकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे. त्यांना सुरक्षिततेची साधने दिली जात नाहीत. ड्रेनेजचे काम करणा-या कर्मचा-यांना अनेकदा मैला हाताने साफ करावा लागतो. यामध्ये कॅव्हेनंजर अॅक्टचे उल्लंघन होत आहे. या अॅक्टप्रमाणे मैला हाताने साफ करणे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. कंत्राटी आणि महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांच्या प्रश्नांकडे आयुक्तांचे दुर्लक्ष होत आहे. आगामी काळात सफाई कर्मचा-यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा स्थायी समितीचे सदस्य विकास डोळस यांनी दिला. कर्मचा-यांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्याची सूचना देखील त्यांनी अधिका-यांना केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (मंगळवारी) पार पडली. सभापती ममता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. महापालिकेत काम करणा-या अनुसूचित जाती आणि सफाई कर्मचा-याच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने आयुक्तांना नोटीस बजावली आहे. मात्र, आयुक्तांनी कोणतीच दखल न घेतल्याबाबत येत्या 5 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली मुख्यालयात हजर राहण्याचे समन्स राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या डॉ.स्वराज विद्वान यांनी जारी केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत सभेत बोलताना विकास डोळस म्हणाले, ”स्वच्छता कर्मचारी हे प्रामाणिकपणे काम करुन शहर स्वच्छ ठेवतात. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. सफाई कर्मचारी प्रतिष्ठित नागरीक आहेत. त्यांचे संविधानिक हक्क त्यांना मिळत नाहीत. महापालिका सफाई कर्मचा-यांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. त्यांना सोयी-सुविधा दिल्या जात नाहीत. महापालिकेच्या वतीने सफाई कर्मचा-यांना सुरक्षा साधने दिली जात नाहीत. मास्क, हातमोजे, गनबुट, बारा साबण, सहा मोठे हातरुमाल, दरमहा दोन झाडू नियमितपणे दिले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाळा संपल्यावर रेनकोट देण्यात आले आहेत. फवारणीची पावडर, फिनेल, अॅसिड हे मुबलक प्रमाणात दिले जात नाहीत. अनेकदा आरोग्य निरीक्षक स्वत:च्या पैशाने औषधे आणतो”.

”ड्रेनेजचे काम करणा-या कर्मचा-यांना अनेकदा मैला हाताने साफ करावा लागतो. यामध्ये कॅव्हेनंजर अॅक्टचे उल्लंघन होत आहे. या अॅक्टप्रमाणे मैला हाताने साफ करणे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. ड्रेनेजमध्ये उतरुन साफसफाई केल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. कंत्राटी आणि महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांचे प्रश्नांकडे आयुक्तांचे दुर्लक्ष होत आहे. महापालिका श्रीमंत आहे. मैला साफ करण्यासाठी अत्याधुनिक मशिन घ्या. तंत्रज्ञानाचा वापर करावा. सफाई कर्मचा-यांच्या सर्व समस्या तातडीने सोडवाव्यात. त्यांना सोयी-सुविधा द्यावात. सफाई कर्मचा-यांकडे दुर्लक्ष केल्यास खपवून घेतले जाणार नाही”, असा इशारा डोळस यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1