ICC Award : सर गॅरफिल्ड सोबर्स आणि सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटूचा पुरस्कार विराटला

धोनीला दशकातील ‘खेळभावना’ पुरस्कार

एमपीसी न्यूज – देशातील सर्वोत्तम खेळाडू आणि संघाची घोषणा ‘आयसीसी’ने केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार एम. एस. धोनी यांनी आयसीसी पुरस्कारावर ठसा उमटवला आहे. दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिला जाणारा सर गॅरफिल्ड सोबर्स पुरस्कार आणि दशकातील सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटू असे मानाचे पुरस्कार विराट कोहलीला मिळाले आहेत. तर, धोनीला दशकातील ‘खेळभावना’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

विराट कोहलीनं 2010 ते 2020 या दशकात एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला असून, सचिन तेंडूलकरचा 12 हजार धावांचा विक्रम मोडीत काढला. गेल्या दशकात 39 शतकं, 48 अर्धशतकं आणि 112 झेल घेणारा कोहली एकमेव फलंदाज आहे.

कोहलीनं दशकात 10 हजारपेक्षा जास्त धावा केल्या. त्यामुळेच विराट कोहलीची दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून निवड झाली आहे. तसेच दशकातील सर्वोत्तम खेळाडूसाठी दिला जाणारा सर गॅरी सोबर्स पुरस्कारासाठीही विराट कोहलीची निवड करण्यात आली आहे.

नॉटिंघम येथे 2011 मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत धोनीनं सर्वांचं मनं जिंकलं होतं. या सामन्यात पंचानी इंग्लंडचा फलंदाज इयान बेल याला चुकीच्या पद्धतीनं धावबाद दिलं होतं. त्यानंतर धोनीनं मोठं मन करत बेलला पुन्हा फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. धोनीच्या या खेळभावनेमुळे त्याला दशकातील सर्वोत्तम ‘खेळभावना’ पुरस्कार मिळाला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या स्टिव स्मिथला दशकातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आलं आहे. अफगाणिस्तानच्या राशिद खानची दशकातील सर्वोत्तम T20 खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. T20 क्रिकेटमध्ये राशिदच्या नावावर सर्वाधिक विकेट आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.