Chakan News : खराबवाडी मधील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडले; दोघांना अटक,

बँकेसह इतर संबंधितांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील खराबवाडी येथे असलेले आयडीबीआय बँकेचे एटीएम चार चोरट्यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण करत फोडले. ही घटना रविवारी (दि. 1) रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. याबाबत चार चोरट्यांसह बँकेचे अधिकारी आणि इतर संबंधित यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेत कोंडीबा दूधगोंडे (वय 19, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर. मूळ रा. परभणी), ऋषिकेश किशोर पवार (वय 22, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर), प्रशांत (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही), छोटू भैया (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) या चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच आयडीबीआय बँक व इतर संबंधितांना देखील या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी अनिकेत आणि ऋषिकेश या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर मधुकर भांगरे (वय 22) या व्यक्तीला आरोपींनी हाताने मारहाण केली. लोखंडी रॉड आणि चाकूचा धाक दाखवून मिरचीपूड चिकन मसाला पूड जवळ बाळगून खराबवाडी येथील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडले. चोरट्यांनी एटीएमचे बंद शटर कुलूप तोडून उघडले. त्यानंतर एटीएमच्या खालील बाजूचा बॉक्स उचकटून मशीन मधील वायरिंग कापले.

तसेच एटीएमच्या बॉक्स वरील असलेल्या कॅमे-यावर काळ्या रंगाच्या चिकट टेपने झाकले. सीसीटीव्ही कॅमे-याला पांढरा कागद आणि त्यावर काळ्या रंगाची चिकट टेप लावून चोरट्यांनी मशीन फोडली. या प्रकरणात किती रक्कम चोरीला गेली याबद्दल अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली आहे.

एटीएमच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी सर्व बँकांना लेखी आदेश दिले होते. या आदेशाला बँकेने थेट केराची टोपली दाखवली. पोलिसांकडून करण्यात आलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतच्या सूचनांकडे बँकेने दुर्लक्ष केले. या प्रकरणात आयडीबीआय बँक आणि इतर संबंधित लोकांना देखील आरोपी करण्यात आले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.