Pimpri: आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षिस योजना; सामान्य करात मिळणार सवलत

 स्थायी समितीची मान्यता; शहरी, ग्रामीणनुसार मिळणार सवलत

एमपीसी न्यूज – शहर हागणदारी मुक्त करणे, घनकच-याचे व्यवस्थापन करणे या अभियांनांतर्गत औद्योगिकनगरीला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी पिंपरी-चिचवड महापालिकेतर्फे राबविण्यात येणा-या ‘आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षिस योजने’स स्थायी समितीने आज (मंगळवारी)मान्यता दिली.  विजेत्या सोसायट्यांना सामान्य करात रेटींगनुसार सूट देण्यात येणार आहे. शहरी भागातील सोसायट्यांना किमान 25 टक्के तर ग्रामीण भागातील सोसायट्यांना 10 टक्के सवलत मिळणार आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या. शहरातील पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कार्यक्षेत्रातील सोसायट्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गतवर्षीपासून सामान्य करात सूट देण्याची बक्षिस योजना जाहीर करण्यात आली आहे. स्थायी समितीच्या 19 सप्टेंबर 2017 सभेतील ठराव क्रमांक 993 आणि 16 जून 2017 महापालिका समिती सभेच्या 84 नुसार बक्षिसाचा ठराव मंजुर करण्यात आला आहे.

ही योजना 2017 ते 2020 या तीन वर्ष कालावधीकरिता राबविली जाणार आहे. 12 ते 100 फ्लॅट, बंगलो, रो हाऊस असलेली सोसायटी आणि 100 हून अधिक फ्लॅट, बंगलो, रो हाऊस असलेली सोसायटी अशा दोन गटांसाठी ही स्पर्धा असणार आहे. त्यातही प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयानिहाय एक या प्रमाणे आठ क्षेत्रिय कार्यालयातून आठ सोसायट्यांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.

या स्पर्धेच्या तपासणीसाठी दोन महापालिका अधिकारी, एक अशासकीय संस्थेचा प्रतिनिधी आणि एक पत्रकार यांचे पथक असणार असून त्यांनी दिलेल्या स्टार रेटींग गुणांच्या आधारे संबंधित सोसायटीला सामान्य करात सूट देण्यात येणार आहे. या बक्षिस योजना धोरणानुसार क्षेत्रीय कार्यालय निहाय सर्वाधिक गुण प्राप्त करणा-या सोसायटी व गृहप्रकल्पांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे आदेश महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र, या योजनेचे यंदा पहिलेच वर्ष असल्याने, या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. या बक्षिस योजनेत सहभाग होणा-या सोसायट्यांमुळे कचरा वाहतूक व विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका व अन्य शासकीय यंत्रणेवर पडणारा अतिरिक्त ताण काही प्रमाणात कमी होत आहे.

या योजनेत सहभागी होणा-या सोसायटी गृहप्रकल्पांनी 66 पेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्यास, सामान्य करात निश्‍चित केलेल्या गुणांकानुसार सवलतीमध्ये बदल करण्यात आले आहे. पहिल्या गटात 12 ते 100 फ्लॅटस्‌ तर दुस-या गटात 100 पेक्षा अधिक फ्लॅट असलेल्या सोसायट्यांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत सहभागी होणा-या सोसायटीला केवळ दोन वेळा पारितोषिक दिले जाणार आहे.

शहरातील भागात फाईव्ह स्टार असलेल्या तीन सोसायट्यांना आदर्श पर्यावरण पर्यावरण संतुलित सोसायटी तपासणीमध्ये शहर स्तरावरील 86 ते 100 दरम्यान गुणांक मिळविणा-या सोसायट्यांना किमान 15 ते 25 टक्के समान्य करात सवलत दिली जाणार आहे. मात्र, शहर स्तर वगळून अन्य सोसायट्यांनी हिच कामिगिरी बजावल्यास किमान पाच तर कमाल 10 टक्के सामान्य करात सूट दिली जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली असून अंतिम मंजूरीसाठी महासभेकडे शिफारस केली आहे.

असे दिले जाणार आहेत गुण!

   मुख्य निकष                                                          गुणांक
# इमारत व परिसरात 100 टक्के कचरा वर्गीकरण व प्रक्रिया      30
#पाणी संवर्धन, पूनर्चक्रण व पुनर्वापर                                     20
#सौर उर्जा प्रकल्प, एलईडी दिव्यांचा वापर                              15
#वृक्षारोपण व संवर्धन, लॅन्डस्केपिंग                                      20
# पर्यावरणपूरक नाविण्यपूर्ण उपक्रम                                    15

एकूण                                                                        100

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.