Pune News : अजित पवारांना मुंबईतच बसायचे असेल तर पालकमंत्री दुसरा नेमा : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा आहे. रेमडेसिवीर वेळेत मिळत नाही, बेड मिळत नाही,  ही परिस्थिती बदलायची असेल, तर पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातच बसले पाहिजे. जर त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून मुंबईत बसायचे असेल तर पुण्याचा पालकमंत्री नवीन नेमला पाहिजे, असे वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुण्यातल्या मॉर्डन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून गरजूंना अन्नाची पाकिटे देण्यात आली. यावेळी पाटील यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. त्यानंतर ते माध्यमासोबत बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पालकमंत्री या नात्याने अजितदादांनी सर्व सोडून पुण्यात येऊन बसले पाहिजे. त्यांना राज्याचे सगळे मुंबईतूनच चालवायचे असेल तर त्यांनी पालकमंत्री म्हणून नवीन नेमणूक करावी. तो पालकमंत्री 24 तास छडी घेऊन बसला पाहिजे. रेमडेसिविर कुठे मिळेल, बेड कुठे मिळेल, ऑक्सिजन कुठे मिळेल याचा विचार त्याने केला पाहिजे.

पाटील म्हणाले, कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करावे लागणे हे जरी बरोबर असले, तरी त्यानंतर जनतेचे होणारे हाल रोखण्यासाठी राज्य सरकारने काय केले. राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन, तसेच ऑक्सिजनची कमतरता आहे. त्यावर सरकार काही करत नाही आणि लॉकडाऊन केले जात आहे, त्याने काय फरक पडेल, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.