Nigdi News : ‘फी अभावी विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज रोखल्यास आंदोलन’

युवा सेनेचा मॉडर्न महाविद्यालयास इशारा

एमपीसीन्यूज : ‘मॉडर्न इन्स्टिटयूट ऑफ बिझिनेस स्टडीज’मधील शैक्षणिक फी शिल्लक असलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज रोखून धरल्याप्रकरणी युवा सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज तातडीने भरावेत; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा युवा सेनेच्यावतीने देण्यात आला आहे.

मॉडर्न इन्स्टिटयूट ऑफ बिझिनेस स्टडीजमधील शैक्षणिक शुल्क बाकी असलेल्या विद्यार्थ्यांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्यात आले नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून युवा सेनेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने मॉडर्न महाविद्यालयात धाव घेत प्राचार्यांची भेट घेतली.

तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने फीच्या कारणावरून कोणत्याही विद्यार्थ्यांचे परिक्षा अर्ज थांबवू नये, असे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज थांबवण्याची ‘मॉडर्न’ची कृती बेकायदेशीर असल्याचे प्राचार्यांच्या निदर्शनास आणून दिले.

सध्या कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली आहे. त्यामुळे फीसाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये. कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिथिती खूपच बिकट आहे असे विद्यार्थी परीक्षेदरम्यान अथवा निकालापूर्वी त्यांची संपूर्ण फी भरतील. त्यासाठी त्यांना सवलत देण्यात यावी, अशी मागणीही युवा सेनेने केली.

दरम्यान, ‘मॉडर्न’मधील सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज तातडीने भरून घ्यावेत; अन्यथा युवा सेनेच्यावतीने कॉलेज समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवा सेना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कक्षाचे सचिव निखित येवले आणि सहसचिव गौरव आसरे यांनी दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.