Nigdi : भक्ती शक्ती चौकातील झेंडा फडकविण्यास भाजप असमर्थ असेल तर शिवसेना झेंडा फडकविणार – आमदार गौतम चाबुकस्वार

एमपीसी न्यूज – निगडी मधील भक्ती शक्ती चौकात देशातील सर्वात उंच झेंडा उभारण्यात आला आहे. मात्र हा झेंडा केवळ उभा केला. तो फडकावत ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी सपशेल अपयशी ठरले आहे. झेंडा उभारल्यापासून सलग एक महिना झेंडा कधीच फडकला नाही. या ना त्या कारणावरून वारंवार झेंडा उतरविण्यात येत आहे. त्यामुळे हा झेंडा फडकविण्यास सत्ताधारी असमर्थ ठरले आहेत. महापालिका प्रशासनाने येत्या 15 ऑगस्ट रोजी झेंडा कायमस्वरूपी फडकविला नाही, तर शिवसेना हा झेंडा फडकवणार आहे, असे शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी सांगितले.

भक्ती शक्ती चौकातील तिरंगा मागील अनेक दिवसांपासून फडकविला जात नाही. याबाबत शिवसेनेने भक्ती शक्ती चौकात निषेध व्यक्त केला. यावेळी आमदार चाबुकस्वार बोलत होते. यावेळी शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक अनंत कोराळे, जितेंद्र ननावरे, युवराज दाखले आदी उपस्थित होते. महापालिका प्रशासनाने येत्या 15 ऑगस्टला झेंडा कायमस्वरूपी फडकवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन शिवसेनेच्या वतीने निगडी पोलिसांना देण्यात आले. हे निवेदन निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरदवाड, तात्या तापकीर यांनी स्वीकारले.

आमदार चाबुकस्वार म्हणाले, राज्यघटनेत ठराविक उंचीचा झेंडा सतत फडकावत ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. केवळ श्रेय घेण्यासठी घाईघाईने हा झेंडा फडकविला आहे. एकदा फडकाविलेला झेंडा वारंवार उतरवला जात आहे. यातून सत्ताधा-यांना राष्ट्रध्वजाबद्दल आस्था नसल्याचे स्पष्ट होत आहे. जर सत्ताधारी हा झेंडा फडकविण्यास असमर्थ असतील तर शिवसेना हा झेंडा डौलाने फडकविणार आहे.

योगेश बाबर म्हणाले, वारंवार झेंडा उतरविण्याच्या सत्ताधा-यांच्या भूमिकेतून वर्षातून फक्त दोनदाच झेंडा फडकविण्याचा पालिका प्रशासनाचा मानस असल्याचे दिसत आहे. हा देशातील सर्वात उंच झेंडा आहे. यापूर्वी ज्या-ज्या ठिकाणी अशा प्रकारचे उंच झेंडे उभारण्यात आले आहेत, त्याबाबत महापालिका प्रशासनाने अभ्यास करायला हवा होता. राष्ट्रध्वज उभारणीत प्रशासनाने कोणतीही काळजी घेतली नाही. वारंवार झेंडा फाटत असून ठोस उपाय योजना करण्यात येत नाहीत. यावरून आयुक्तांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

सुलभा उबाळे म्हणाल्या, भक्ती शक्ती चौकात देशातील सर्वात उंच झेंडा उभारण्याची संकल्पना राष्ट्रवादीने मांडली. भाजपने ती पूर्ण केली. पण संकल्पना पूर्णत्वास नेत असताना त्यासाठी योग्य उपाय योजना केली नाही. कुठल्याही सूचना लक्षात घेतल्या नाहीत. नागरिक जेंव्हा झेंड्याकडे बघतात तेंव्हा त्यावर झेंडा दिसत नाही, ही बाब सामान्य नागरिकांना चटका लावणारी वाटते. शौचालय बांधण्यासाठी सुद्धा सल्लागार नेमणारे सत्ताधारी राष्ट्रध्वजाच्या बाबतीत एवढे गाफील कसे काय? असा प्रश्न शहरातल्या प्रत्येक नागरिकाला पडला आहे. येत्या 15 ऑगस्टला कायमस्वरूपी झेंडा फडकावला नाही, तर शिवसेना आयुक्तांच्या तोंडाला काळे फसणार आहे, असेही उबाळे म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.