Chinchwad News : पोराची काळजी असेल तर पैसे पाठवून दे; व्यावसायिकाला खंडणीची धमकी

खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एका अनोळखी व्यक्तीने चिंचवड येथील एका व्यावसायिकाला फोन करून धमकी दिली. तुला तुझ्या पोराची काळजी नाही का, पोराची काळजी असेल तर पैसे पाठवून दे, असे म्हणून अनोळखी व्यक्तीने व्यावसायिकाकडे खंडणी मागितली. ही घटना मंगळवारी (दि. 23) दुपारी तीन वाजताच्या सुमारास चिंचवड येथे घडली.

बाबू सायबन्ना म्हेत्रे (वय 56, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8805226869 या क्रमांकावरून बोलणाऱ्या अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू ठुबल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास फिर्यादी यांना अनोळखी व्यक्तीने 8805226869 या मोबाईल क्रमांकावर फोन केला. तुझ्या मुलाचा गाडी नंबर 0059 असा आहे. तुला तुझ्या पोराची काळजी नाही का. पोराची काळजी असेल ना तर पैसे पाठवून दे. मी कंपनीचा माणूस आहे. मुंबईवरून बोलतोय. पैसे पाठवून दे आणि तूच सांग किती पैसे देणार ते. मी उद्या कधी फोन करू ते तूच सांग, असे बोलून फिर्यादी यांच्या मुलाला क्षती पोहोचवण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली.

आरोपीने फोनवर कंपनीचा माणूस असल्याचा उल्लेख केला आहे. ही कंपनी कोणती, आरोपी कोणत्या गुन्हेगारी टोळीशी जोडला गेला आहे का, याबाबत तपास सुरु आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू ठुबल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.