Pimpri News : लोकांमध्ये असंतोष निर्माण झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल; ‘स्पर्श’वर कारवाई करा

पोलीस आयुक्तांचा पालिका आयुक्तांना इशारा

एमपीसी न्यूज – ऑटो क्‍लस्टर येथील कोविड सेंटर चालविणाऱ्या स्पर्श संस्थेने गरजू रुग्णांकडून बेड आणि इतर वैद्यकीय सेवा मिळवून देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याच प्रमाणे आणखी अनेक रुग्णांची फसवणूक व पिळवणूक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्पर्श या संस्थेने गैरव्यवहार तसेच भ्रष्टाचार केल्याचे दिसून आल्याने या संस्थेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी. जनतेची अशीच पिळवणूक होत राहिली तर जनतेच्या मनात असंतोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, असा इशारा पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी महापालिका आयुक्‍तांना दिला आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्र पाठवले आहे. त्यात पोलीस आयुक्तांनी हा इशारा दिला आहे.

पोलीस आयुक्तांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, स्पर्श प्रायव्हेट लिमीटेडचे कन्सलटंट म्हणून डॉ. जाधव कार्यरत आहेत. वरिल नमूद आरोपी यांनी त्याच्या गुन्हयामधील सह आरोपी डॉ. सचिन श्रीरंग कसबे आणि डॉ. शशांक भरत राळे, पद्मजा हॉस्पीटल, वाल्हेकरवाडी, चिंचवड, यांच्याशी संगनमत करुन महानगरपालिकेच्या कोवीड हॉस्पीटलमध्ये बेड उपलब्ध करणे व इतर वैद्यकीय सेवा मिळवून देण्याच्या नावाखाली गरजू रुग्णांकडून मोठया प्रमाणात पैसे घेण्याचा गैरप्रकार उघडकीस आला आहे.

तसेच आणखीन काही रूग्णांची फसवणूक व पिळवणुक झाली असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मागील वर्षी करोना साथीचे दरम्यान स्पर्श प्रायव्हेट लिमीटेडद्वारे भोसरी येथे रामस्मृती मंगल कार्यालय व हिरा लॉन्स या दोन ठिकाणी कोवीड केअर सेंटर चालविले जात होते. सदर ठिकाणी रूग्णांवर उपचार न करताच पाच कोटी 26 लाख रुपयांचे खोटे बिल सादर केल्याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आयएएस दर्जाचे अधिकाऱ्यांचे मार्फत चौकशी सुरू आहे. ऑटो क्‍लस्टर पिंपरी येथील हॉस्पीटलचे व्यवस्थापन देखील स्पर्श संस्थाच करत आहे.

सध्याच्या दाखल गुन्ह्या संबंधीत उघडकीस आलेला भ्रष्टाचार व गैरव्यवहार लक्षात घेता या महामारीच्या काळामध्ये लोकांची अशीच पिळवणुक होत राहिली तर भविष्यात जनतेमध्ये असंतोष निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होण्याची दाट शक्‍यता नाकारता येत नाही. तरी ऑटो क्‍लस्टर येथे कोव्हिड हॉस्पीटल चालविणाऱ्या स्पर्श प्रायव्हेट लिमीटेड संस्थेवर योग्य ती कार्यवाही होणेस विनंती आहे.

काय आहे स्पर्शचा प्रकार –

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्‍लस्टर येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी स्पर्श हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांनी एक लाख रुपये घेतल्याची क्‍लिप शहरात व्हायरल झाली. या क्‍लीपमुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गोंधळ निर्माण झाला. यावेळी महापालिका आयुक्‍त राजेश पाटील यांनी संबंधित संस्थेच्या विरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर 1 मे 2021 रोजी महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त उल्हास जगताप यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात स्पर्श संस्थेच्या विरोधात फिर्याद दिली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पहिल्याच दिवशी स्पर्श संस्थेचे डॉ. प्रवीण जाधव, वाल्हेकरवाडी येथील पद्‌मजा हॉस्पिटलचे डॉ. शशांक राळे आणि डॉ. सचिन कसबे यांना अटक केली. आरोपी डॉ. कसबे यांच्या खासगी रुग्णालयात तीन लाख 10 हजार रुपये जप्त केले. त्यानंतर केलेल्या तपासात आणखी एका महिला डॉक्‍टरला अटक करीत तिच्या घरातून दहा हजारांची रोकड जप्त केली. तर आरोपी डॉ. प्रवीण जाधव यांच्याकडूनही 50 हजारांची रोकड जप्त केली. या डॉक्‍टरांनी एकूण चार रुग्णांकडून पैसे लुबडल्याचे तपासात निष्पन्न झाले. सध्या हे चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

पोलिसांचे आवाहन –

महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेण्यासाठी कुठेही अधिकृतपणे पैसे घेतले जात नाहीत. जर रुग्णांना अथवा नातेवाईकांना पालिकेच्या कोविड सेंटर, रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी पैशांची मागणी झाली असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा. असे आवाहन पिंपरी चिंचवड पोकिसंकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.