Chakan News : ‘गाडी कंपनीत लाव नाहीतर महिन्याला 25 हजार हप्ता दे’ म्हणत एकावर खुनी हल्ला

0

एमपीसी न्यूज – चाकणच्या औद्योगिक पट्ट्यातली गुन्हेगारी संपण्याचे नाव घेत नाही. कंपनी मालक, अधिका-यांना धमकावणे, मारहाण, हप्ते मागणे असे प्रकार सुरूच आहेत. आपली गाडी कंपनीत लावावी अन्यथा 25 हजारांचा महिन्याला हप्ता द्यावा, अशी मागणी करत चौघांनी मिळून एकावर तलवारीने खुनी हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. 19) रात्री म्हाळुंगे इंगळे येथील अल्ट्राटेक सस्पेंशन प्रा ली या कंपनीच्या गेटवर घडली.

लोकेश रवींद्र पाटील (वय 22, रा. म्हाळुंगे) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मंगेश गणपत आंबोले (वय 33, रा. सुदुंबरे, ता. मावळ) याला अटक करून त्याच्यासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी म्हाळुंगे इंगळे येथील अल्ट्राटेक सस्पेंशन प्रा ली या कंपनीत काम करतात. शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास आरोपी तलवार घेऊन कंपनीच्या गेटवर आले. ‘तु मला ओळखत नाही. तु मला विचारणारा कोण? थांब तुला जिवंत सोडत नाही. तुला मारून टाकतो’ अशी आरोपींनी फिर्यादी यांना धमकी दिली.

त्यानंतर ‘माझी गाडी कंपनीत कामाला लावा. नाहीतर मी कोणाला सोडणार नाही. माझी गाडी कामाला नाही लावली तर मला दर महिना 25 हजार रूपये हप्ता द्या’ असे म्हणून फिर्यादीस तसेच कंपनीच्या अधिका-यांच्या नावाने शिवीगाळ दमदाटी केली. आरोपीने फिर्यादी यांना ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार चालवली.

त्यात कंपनीची सिक्युरीटी केबीनची काच फुटली. तसेच आरोपी मंगेशचे इतर तीन साथीदार यांनी देखील शिवीगाळ, दमदाटी करून फिर्यादी यांना मारण्याच्या उद्देशाने धावून आले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.