Pimpri : रॉंग साईडने वाहन चालवाल तर गुन्हेगार व्हाल

विरुद्ध दिशेने वाहन चालविणा-यांवर भादंसं कलम 279 प्रमाणे गुन्हे दाखल करण्याचे आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज – वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यास संबंधित वाहनचालकावर भारतीय दंड संहिता कलम 279 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यानुसार वाहनचालकाला सहा महिने कैद होऊ शकते. त्याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत.

आयुक्त म्हणाले, “विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. तसेच मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता असते. बेशिस्त वाहतूक केल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी आणि त्यामागे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण अशा भयंकर समस्या निर्माण होतात. वाहतुकीच्या प्रत्येक नियमाचे पालन केल्यास वाहतूक कोंडीसारख्या वाहतुकीच्या समस्या येणार नाहीत. नो पार्किंग, रॉग साईड, नो एण्ट्री, ट्रिपल सीट, सिग्नल कटिंग अशा लहान लहान चुकांना सुधारून वाहतुकीला शिस्त लागणार आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणा-यांवर यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार आहे.”

विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यास भारतीय दंड संहिता कलम 279 नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामध्ये संबंधित वाहन चालकाला सहा महिन्यांपर्यंत कैद होऊ शकते. किंवा एक हजार रुपये दंड होऊ शकतो. किंवा वरील दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्याचबरोबर संबंधित वाहन चालकांवर सरकार दप्तरी गुन्हेगार असा शिक्का बसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मागील दोन दिवसांपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात एकूण 19 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये पिंपरीमध्ये सात, तळेगाव दाभाडे तीन, हिंजवडी दोन, वाकड, सांगवी, देहूरोड, चिंचवड, निगडी, भोसरी, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एक असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.