Chandani Chowk Traffic : वर्षभर सामान्यांकडे दुर्लक्ष; मात्र मुख्यमंत्री अडकताच 12 तासांत उपाययोजना

एमपीसी न्यूज – जुने लोक म्हणत की, सोनारा शिवाय कान टोचले जात नाहीत,अगदी तसेच काहीसे चांदणी चौकातील ट्राफिकच्या बाबतीत झाले आहे.मुख्यमंत्र्यांची गाडी या ट्राफिकमध्ये अडकली अन् प्रशासनाला जाग आली.अवघ्या 12 तासात बैठक घेत प्रशासनाने या मार्गावरील वाहतुकीसाठी उपाय योजना ही आखल्या आहेत म्हणे.अर्थात उशीरा का होईना प्रशासनाला शहाणपण आले हे ही नसे थोडके. मात्र या साऱ्यात प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे सामान्य नागरिकांचा, जोपर्यंत मंत्री संकटात अडकत नाहीत तोवर उपाययोजना होणारच नाहीत का ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

या साऱ्यात सामान्य नागरिकांचे काय कारण गेल्या कित्येक वर्षांपासून याच वाहतूककोंडीचा सामना करत आहेत.चांदणी चौक हा कोथरूड, कात्रज, हिंजवडी, वाकड अशा भागांना जोडतो त्यामुळे जलद गतीने प्रवास व्हावा यासाठी बनवलेला महामार्ग मात्र वाहतुककोंडीने डोकेदुखी ठरत आहे.अगदी कित्येक वर्षांपासून अडचण ठरत असणारा चांदणी चौकातील पूल ही आता मुख्यमंत्र्याच्या निर्देशानंतर अवघ्या 15 दिवसांत पाडला जाणार आहे. नऊ लेनद्वारे येणारी वाहतूक या चौकात केवळ तीन लेनमध्ये विभागली जाते हे देखील प्रशासनाला काल समजले.

महामार्गापेक्षा शहरातून जाणे बरे वाटते

सुरुवातीला मात्र आम्ही या महामार्गाचा वापर करत होतो. मात्र काही वर्षांपासून अगदी शहरातील मार्गांचा वापर करून आम्ही जातो किंवा जाणे टाळतो कारण साधारण एक तास तर याच मार्गावर जातो.आता मुख्यमंत्री अडकले तेव्हा तरी प्रश्न सुटावा ही अपेक्षा आहे,असे मत हेमंत जाधव (नागरिक) यांनी व्यक्त केले आहे.

या वाहतूक कोंडीत मुख्यमंत्री आधिच का अडकले नाहीत?

हा रस्ता मुळात मुख्य रहदारीचा आहे.केवळ ट्राफिक जाम नाही तर त्यातून रोज रस्त्यावर नागरिकांची भांडणे होतात.गाडीला गाडी घासली जाते, अपघात झाला तर मग विचारच करायला नको अशी अवस्था होते.प्रशासन छोटे जरी काम असेल तर बॅरीगेटस लावून रस्त्याचा अर्धा भाग तरी अडवून ठेवते.वर्ष-वर्ष हे बॅरीगेटस हलवले जात नाहीत आज अगदी 15 दिवसात ते अख्खा पूल पाडत आहेत, अशावेळी मुख्यमंत्री आधिच या वाहतूक कोंडीत अडकले असते तर बरे झाले असेत असे वाटायला लागले आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रीया कल्याणी साखरे (व्यावसायीक) यांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांनाही शिस्तीची गरज

वाहतूककोंडी होते हे सत्य आहे मात्र यात केवळ प्रसासन दोषी नाही तर महामार्ग हा केवळ बाह्य वाहतूकीसाटी, जड वाहनांसाठी वापरणे अपेक्षीत आहे. मात्र नागरिक लवकर पोहचण्याच्या घाईत महामार्गाचा वापर करतात अन गर्दीने वाहतूक कोंडी होते. कारण या महामार्गावर अजून काम सुरू असून त्याचे काम झाले तर भविष्यात त्याचा सर्वांनाच लाभ मिळणार आहे. प्रसासन व नागरिक यांनी एकत्रीत सहकार्य करणे यात अपेक्षित आहे, असे मत अभिजीत चव्हाण (चांदणी चौक,रहिवासी) यांनी व्यक्त केले आहे.

सर्व गोष्टींचा उहापोह केला तर एकच म्हणावे लागेल की उशीरा का होईना सर्वांच्या सहकार्यातून चांदणी चौक भविष्यात तरी मोकळा श्वास घेईल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.