Talegaon News : घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याला मृतदेहांचे होतेय बेकायदेशीर दफन : श्रीजित रमेशन

दफनभूमीसाठी अधिकृत जागा उपल्बध करण्याची मागणी

एमपीसीन्यूज : घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याजवळ  जुना पुणे -मुंबई महामार्गालगत कोणतीही परवानगी न घेता मृतदेहांचे बेकायदेशीररित्या दफन केले जात आहे. या माध्यमातून गैरप्रकार घडण्याची दाट शक्यता असून, या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता श्रीजित रमेशन यांनी केली आहे. तसेच देहूरोड व परिसरातील काही समाजबांधवांची स्वतंत्र दफनभूमी तयार करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही रमेशन यांनी केली आहे.

यासंदर्भात रमेशन यांनी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड, मावळचे तहसीलदार यांच्यासह संबंधित शासकीय विभागांच्या प्रमुखांना निवेदन पाठविले आहे.

निवेदनात म्हटले आहे की मावळ तालुक्यातील जुना- पुणे मुंबई महामार्गावरील शेल पेट्रोल पंपाजवळ घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याजवळ काही लोक रात्रीच्यावेळी विनापरवानगी तसेच मृत व्यक्तिची कोणतीही शासकीय नोंद ना करता स्मशान दाखला नसतानाही दफनविधी करीत आहेत. हा सर्व प्रकार आपण स्वतः घटनास्थळी जाऊन पहिला आहे. हा सर्व प्रकार रात्रीच्या वेळी सुरु असल्याने संशयास्पद वाटत आहे.

कोविड साथीच्या आजच्या या आपत्तीजनक परिस्थितीत कोणत्याही कागदपत्रांशिवाय किंवा मृत्यूचे कारण दाखल्याशिवाय मृतदेह दफन करणे फार गंभीर प्रकरण आहे. जर अशा प्रथांना परवानगी असेल तर मृतदेह दफन करण्याचा धोका आहे. त्यामुळे स्थानिक अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीरपणे दखल घावी आणि त्वरित संबंधितांवर कठोर कारवाई करावी.

त्याचबरोबर बेकायदेशीररीत्या मृतदेह दफन न करण्याबाबत संबंधित ठिकाणी नोटीस लावावी, अशी मागणी रमेशन यांनी केली आहे.

देहूरोड कॅंटोमेंट बोर्ड हद्दीत मुस्लिम कब्रिस्तानशेजारील जागेतही अशाच पद्धतीने कागदपत्रांशिवाय लोक उघडपणे मृतदेह दफन करतात, याकडेही त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे.

दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करावी

मृतदेहांचे दफन कायदेशीर पद्धतीने व्हावे यासाठी विशिष्ट समाज घटकांना दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसेच त्यांना कायदेशीररित्या दफनविधी करता यावा यासाठी योग्य कागदपत्रे, वैद्यकीय प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करण्याची व्यवस्था करावी. त्यामुळे मृत्यूची अधिकृत नोंद होण्यास मदत होईल. शिवाय भविष्यात गंभीर गुन्हे घडण्यास पायबंद बसेल, असेही रमेशन यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.