Pimpri : अवैध धंद्यांविरोधात अण्णा हजारेंना साकडे

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारीबरोबरच अवैध धंद्याविरोधात अपना वतन संघटनेच्या वतीने मोहीम उघडण्यात आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन शहरातील अवैध धंदा विरोधात 17 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात येणाऱ्या उपोषणाविषयी माहिती देण्यात आली.

अपना वतन संघटनेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी व अवैध धंद्याविरोधात राज्य सरकार व पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन व सर्व पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन दिलेले आहे. अनेकवेळा आंदोलने केली आहेत. परंतु, पोलिसांकडून हप्ते वसुली करून अवैध धंद्यांना अभय दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हप्ते वसुली करून अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी 17 नोव्हेंबरपासून उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे.

अपना वतन संघटनेच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. या वेळी अण्णा हजारे यांनी याबाबत मार्गदर्शन केले. सदर आंदोलनाबाबत सकारात्मक चर्चा झाली आणि आंदोलनास अण्णांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी अपना वतनचे अध्यक्ष सिद्दीक शेख, हमीद शेख, सलीम शेख, हरिशचंद्र तोडकर, अस्लम शेख आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.