Chikhali : चिखली प्रभागात तातडीने पोटनिवडणूक घ्या; शिवसेनेची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत चिखली प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव असलेल्या जागेवर विजयी झालेले भाजपचे नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाले आहे. त्यामुळे या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी. गायकवाड यांचे नगरसेवकपद रद्द करत चिखली प्रभागात तातडीने पोटनिवडणूक घ्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. 

शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव – पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने आज (गुरुवारी)आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन ही मागणी केली. गटनेते राहुल कलाटे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, सचिन सानप, नितीन रोकडे, विश्वनाथ टेमगिरे, निलेश मुटके, आशा भालेकर, दत्तात्रय भालेराव आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.

खासदार आढळराव म्हणाले, कुंदन गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र दुस-यांदा रद्दबादल करण्यात आले आहे. तसेच, त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने व्हावी. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्याची दखल घेत तातडीने याबाबतचा अहवाल राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे (क्रमांक – 2) पाठविण्यात येईल, असे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.