Pune : महापूर बाधित 26 कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करा, अन्यथा महापालिकेत राहण्यास येणार – धीरज घाटे 

एमपीसी न्यूज – पुण्यात 25 सप्टेंबरला आलेल्या महापुरात राजेंद्रनगर, आंबील ओढा भागातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. 26 कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करावे, अन्यथा पुणे महापालिका कार्यालयात नागरिकांसोबत राहण्यास येणार असल्याचा इशारा भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत दिला.

26 कुटुंबे 2 महिन्यांपासून महापालिका शाळेत राहतात. त्यांचे कोणतेही पुनर्वसन करण्यात आले नाही. ही कुटुंबे 40 वर्षांपासून तिथे राहतात. त्यांना तुम्ही हडपसर येथे ‘बियसयूपी’च्या घरांत पुनर्वसन करता, हे बरोबर नाही. या लोकांच्या मुलांचे शिक्षण तिथेच होत आहे. त्यांचे आयुष्य तिथे गेले. त्यामुळे या नागरिकांचे तिथेच पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी घाटे यांनी केली. तर, याच परिसरात पुनर्वसन करणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे असल्याचे असल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले. त्यावर घाटे यांनी संताप व्यक्त केला.

महापूर आल्यानंतर महापालिका प्रशासनाने नेमक्या काय उपाययोजना केल्या, ड्रेनेज, रोड, पाणी, रस्ते याची काय व्यवस्था केली, याचा सविस्तर अहवाल ठेवण्याचा आदेश प्रभारी महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रशासनाला दिला. महापौर दालनात सर्वच राजकीय पक्षांच्या गटनेत्यांच्या उपस्थितीत हा अहवाल ठेवण्यास सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.