Pune News : दुकानदारांना दहा हजार रुपये दंडाची केलेली तरतूद तत्काळ रद्द करण्याची मागणी

एमपीसी न्यूज :  कोरोनाच्या नव्या संकटाला रोखण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन नियमावलीमध्ये लसीकरण पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींना पाचशे रुपये दंड व दुकानांमध्ये लसीकरण पूर्ण न केलेला ग्राहक आढळल्यास दहा हजार रुपये दंडाची केलेली तरतूद तत्काळ रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिजचे आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना याबाबत निवेदन दिले असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष ललित गांधी आणि कॅटचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली.

व्यापारी आपल्या आस्थापनांमध्ये लसीकरण पूर्ण कॅटची मागणी केलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देतील मात्र, एखाद्या ग्राहकाच्या चुकीची शिक्षा दुकानदाराला देणे योग्य नाही. त्यामुळे सरकारने दंडाची ही तरतूद त्या त्या व्यक्तीला लागू करावी. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना संबंधीच्या विविध निर्बंधांमुळे मुळातच व्यापारी वर्ग अडचणीत आला आहे. आता कुठे व्यापार सुरळीत व्हायला सुरुवात झाली

आहे. दोन वर्षांचे नुकसान भरून कसे काढायचे या विवंचनेत व्यापारी आहेत. त्यामुळे ही दंड आकारणी रद्द करण्याची मागणी गांधी आणि बाठिया यांनी केली आहे. ग्राहकाने मास्क न घातल्यास दहा हजार रुपये दंड घेण्याच्या निर्णय दुकान आणि विविध कार्यालयांसाठी लागू होणार आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा. तसेच, मास्क न घातलेल्या व्यक्तीकडून एक हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. त्याऐवजी तो दंड ५०० रुपयापर्यंत कमी करावा, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अॅड. फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.