Pimpri : च-होली, मोशी, डुडुळगावातील रस्ते विकासाच्या जागांचे भूसंपादन तातडीने करा – महेश लांडगे

नगररचना व विकास विभागाची  घेतली बैठक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये रस्त्यांचे जाळे उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्यांच्या जागांचे भूसंपादन करण्याची गरज आहे. मोशी, दिघी, च-होली, डुडुळगाव येथील रस्त्याच्या निविदा निघाल्या आहेत. त्यामुळे जागांचे त्वरित भूसंपादन करण्यात यावे, असे निर्देश आमदार महेश लांडगे यांनी अधिका-यांना दिले आहेत.

भोसरी मतदार संघातील भूसंपादनाबाबत आमदार महेश लांडगे यांनी सोमवारी (दि.8)नगररचना व विकास विभागाची आयुक्त दालनात आढावा बैठक घेतली. यावेळी भूसंपादनाची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश आमदार लांडगे यांनी अधिका-यांना दिले आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर, नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकुर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूसंपादन अधिकारी सांकला साहेब, देव साहेब, महापालिकेचे भूमी अभिलेख अधिकारी शिवाजी भोसले, हवेलीच्या गौड मॅडम यांच्यासह नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये प्रशस्त रस्ते झाले पाहिजेत. त्यासाठी आरक्षणाच्या जागा ताब्यात घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने नगररचना विभागाने पाऊले टाकणे अपेक्षित आहे. मोशी, दिघी, च-होली, डुडुळगावातील रस्त्याच्या निविदा निघाल्या आहेत. परंतु, भूसंपादन झाले नाही. त्यासाठी तात्काळ भूसंपादन करण्यात यावे. तसेच यावेळी मंजूर प्रकरणाचा आढावा घेण्यात आला”

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “प्रलंबित जागांचा भूसंपादनाचे काम तातडीने हाती घेण्यात यावे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत.  भूमी अभिलेख हवेली आणि महापालिकेच्या नगररचना विभागास तत्काळ मोजणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.