Ravet : बंधारा, नद्यांमधील जलपर्णी तातडीने काढा; मयूर कलाटे यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी रावेत येथील बंधा-यातून पाणी उचलले जाते. परंतु, या रावेत जलशुद्धीकरण प्रकल्पा भोवतालच्या परिसरामध्ये पाण्यामध्ये बेसुमार जलपर्णी वाढलेली आहे. त्यामुळे तेथील पाणी अशुद्ध  व दुर्गंधीयुक्त झालेले आहे. या जलपर्णीमुळे संपूर्ण शहराचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे बंधारा, नद्यांमधील जलपर्णी तातडीने काढण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी केली.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये कलाटे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमधून वाहणा-या पवना, इंद्रायणी व मुठा नदींच्या पात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरली आहे. नदीचे पात्र सुद्धा ओळखू येत नाही, अशी परिस्थिती झाली आहे. जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी निविदा काढली जाते. परंतु ठेकेदार जुजबी काम करून जलपर्णी न काढता पावसाळ्याची वाट पाहतो.

पूरांच्या पाण्यामुळे जलपर्णी वाहून जाते आणि ठेकेदार काम न करता निविदेचे पैसे महापालिकेकडून घेतात. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होते. शहरातील नागरिकांना या जलपर्णीमुळे खूप त्रास होतो. जलपर्णीमुळे डांस, मच्छरची पैदास होते.  त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच साथीच्या रोगांचा फैलाव होत आहे. रावेत जलशुद्धीकरण प्रकल्पाभोवतालच्या परिसरातील तसेच शहरातून वाहणा-या नद्यांमधील जलपर्णी तातडीने काढण्यात यावी, अशी मागणी कलाटे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.