Talegaon Dabhade News : कृत्रिम हौदात विसर्जन करून तसेच मूर्तीदान करत तळेगावकरांनी भक्तीपूर्ण वातावरणात दिला गणरायाला निरोप   

एमपीसी न्यूज – तळेगावकरांनी परंपरेनुसार सातव्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप दिला. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला साद देत तळेगावकरांनी कृत्रिम हौदात विसर्जन करून तसेच मूर्तीदान करून गणेश विसर्जन केले. सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुका न काढता तसेच काही मंडळांनी मंडळाच्या मंडपात कृत्रिम हौद बनवून विसर्जन करत श्री गणेशाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची प्रार्थना केली. दाभाडे राजघराण्यातील विसर्जन झाल्यानंतर परंपरेनुसार शहरातील सर्व ठिकाणी गणेश विसर्जन झाले.

तळेगाव शहरातील नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमाचे पूर्ण पालन करून सार्वजनिक विसर्जन मिरवणूका न काढता काही जणांनी आपल्या मंडळाच्या मंडपातच कृत्रिम हौद तयार करून तर काहींनी मूर्तीदान करून विसर्जन केले. तसेच काही नागरिकांनी आपल्या घरीच तयार केलेल्या विसर्जन कुंडात भक्ती भावाने व उत्साहाने श्रीच्या मूर्तीचे विसर्जन केले.तर अनेकांनी मूर्ती संकलन करणा-या केंद्रावर जाऊन मूर्तीदान केले.      

तळेगाव शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव सात दिवसाचा असतो. ऐतिहासिक परंपरेनुसार गणरायाचे विसर्जन होते. राज घराण्यातील मानाच्या गणपतीचे दुपारी 12 नंतर विसर्जन होते. त्या नंतर इतर ठिकाणाचे विसर्जन होते.

यावर्षी राजघराण्यातील श्रींमंत सरदार सत्येंद्रराजे दाभाडे यांनी विधिवत पूजा करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, शासन नियमाचे पालन करून मानाच्या पालखीतून मूर्ती न आणता आपल्या खाजगी वाहनातून येऊन मूर्ती संकलन केंद्रावर मूर्तीदान केले.यावेळी त्यांच्या समवेत शिव व्याख्याते ॲड विनय दाभाडे,ग्राम पुरोहित मयूर रेडे सह सहकारी होते. 

नगरपरिषदेकडून आरोग्य समिती सभापती किशोर भेगडे यांनी देखील तळेगावात अनेक वाहनांच्याव्दारे मूर्ती संकलन करून विधिवत विसर्जन केले.

तळेगाव शहरात विसर्जनाकरिता जनसेवा विकास समितीकडून जनसेवा समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी श्री गणेश मूर्तीदान करणे, कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचे कार्य विधिवत पार पाडले. या कार्यात नगरसेवक गणेश खांडगे, गणेश काकडे,निखील भगत,रोहित लांघे,समीर खांडगे,सुनील कारंडे, प्रवक्ते मिलिंद अच्युत, कल्पेश भगत,सुनील पवार,समीर दाभाडे, दीपक कारके आदि सहका-यांनी सहभाग घेतला होता.

नगरसेवक संतोष भेगडे युवा फौंडेशन कडून संतोष भेगडे यांनी तळेगावात 25 वाहनांच्याव्दारे श्री मूर्ती संकलन व विधिवत विसर्जन केले. श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे संकेत सतीश खळदे,जितेंद्र खळदे,विशाल वाळूंज,अक्षय टकले तसेच सभागृहनेते अरुण भेगडे पाटील, नगरसेविका शोभा भेगडे, अमोल शेटे आदि नगरसेवकांनी सहभाग घेऊन शासनाच्या नियमानुसार घरोघरी वाहानांची व्यवस्था करून मूर्ती संकलन केले. यामध्ये काही जणांनी नगर परिषदेकडे विसर्जनासाठी मूर्ती सुपूर्द केल्या.तर काही जणानी विधिवत पूजा करून विसर्जन केले.

सार्वजनिक विसर्जनाचा दिवस लक्षात घेऊन  तळेगाव दाभाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आला होता.तर मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेकडून योग्य नियोजन करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.