Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहर परिसरातील 982 मंडळे तर एक लाखाहून अधिक घरगुती गणपतीचे विसर्जन; पोलिसांचा चोख बंदोबस्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 982 सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन आज (रविवारी, दि. 19) दहाव्या दिवशी होणार आहे. तर सुमारे एक लाख 10 हजार 530 घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दोन पोलीस उपायुक्त, पाच सहाय्यक पोलीस आयुक्त, 63 पोलीस निरीक्षक, 79 सहाय्यक पोलीस निरीक्षक / उपनिरीक्षक, 808 पोलीस अंमलदार, 126 होमगार्ड,  राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) एक तुकडी, दोन दंगा काबू पथके असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मावळ परिसरात बहुतांश ठिकाणी सातव्या दिवशी गणेश विसर्जन होते. तसेच पिंपरी चिंचवड शहरात देखील काही ठिकाणी पाचव्या, सातव्या दिवशी गणेश विसर्जन केले जाते. मात्र बहुतांश मंडळांच्या आणि घरगुती गणपतीचे दहाव्या दिवशी विसर्जन होते.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 16 पोलीस स्टेशन (रावेत चौकीचे पोलीस ठाण्यात रूपांतर करण्यासाठी नुकतीच राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे), दोन पोलीस चौक्या यांच्या हद्दीत एकूण 982 सार्वजनिक गणेश मंडळाचे रविवारी विसर्जन होणार आहे.

घरगुती गणपतींचे देखील मोठ्या प्रमाणात विसर्जन होणार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एक लाख 10 हजार 530 घरगुती गणेश विसर्जन होईल असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने रविवारी पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे प्रशासनाने आदेश दिले आहेत.

नागरिकांनी व गणेश मंडळांनी कृत्रिम हौदात गणेश विसर्जन करावे असे आवाहन करत मिरवणुका काढू नये तसेच गर्दी करू नये असे देखील प्रशासनाने आदेश दिले आहेत. त्यामुळे मिरवणुका, गर्दी, अनुचित प्रकार यावर पोलिसांचे बारीक लक्ष असणार आहे.

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेश विसर्जन –

पिंपरी – 82

चिंचवड – 29

भोसरी – 87

भोसरी एमआयडीसी – 42

निगडी – 60

दिघी – 42

चाकण – 88

आळंदी – 89

म्हाळुंगे – 66

वाकड – 113

हिंजवडी – 35

सांगवी – 28

देहूरोड – 74

तळेगाव – 15

तळेगाव एमआयडीसी – 30

चिखली – 71

रावेत – 12

शिरगाव – 19

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.