Importance of Makar Sankranti : मकरसंक्रांतीचे महत्त्व

एमपीसी न्यूज : – मकरसंक्रातीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हिंदु धर्मात संक्रांतीला देव मानले आहे. भारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी तीळगुळाचे वाटप करून प्रेमाची देवाण-घेवाण केली जाते.सध्या सर्वत्र कोरोना महामारी मुळे नेहमीप्रमाणे सण साजरा करण्यास निर्बंध येऊ शकतात.

तरीपण या निर्बंधाच्या काळात  शासनाने घालून दिलेले सर्व नियमांचे काटेकोर पालन करून हा सण साजरा करू शकतो.हा सण साजरा करताना या सणाचे महत्त्व,सण साजरा करण्याची पद्धत,तीळगुळाचे महत्त्व,पर्वकाळी दानाचे महत्त्व, हळदीकुंकू करण्याचे आध्यात्मिक महत्त्व तसेच या दिवशी करायचे धार्मिक विधी याविषयीची माहिती या लेखामधून देण्याचा प्रयत्न केला आहे. याचा लाभ करून घेऊयात.

तिथी – हा सण तिथीवाचक नसून अयन वाचक आहे. या दिवशी सूर्याचे निरयन मकर राशीत संक्रमण होते. सध्या मकरसंक्रांतीचा दिवस 14 जानेवारी हा आहे. सूर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी क्वचित प्रसंगी संक्रांतीचा दिवस एक दिवसाने पुढे ढकलला जातो. सूर्याच्या उत्सवाला ‘संक्रांत’ असे म्हणतात. कर्क संक्रांतीनंतर सूर्य दक्षिणेकडे जातो आणि पृथ्वी सूर्याच्या जवळ, म्हणजे खाली जाते. यालाच ‘दक्षिणायन’ असे म्हणतात. मकरसंक्रांतीनंतर सूर्य उत्तरेकडे जातो आणि पृथ्वी सूर्यापासून दूर, म्हणजे वर जाते. यालाच ‘उत्तरायण’ असे म्हणतात. मकरसंक्रांत म्हणजे खालून वर चढण्याचा उत्सव; म्हणून याला अधिक महत्व आहे.

इतिहास – संक्रांतीला देवता मानलेले आहे. संक्रांतीने संकरासुर दैत्याचा वध केला, अशी कथा आहे.

तीळगुळाचे महत्त्व – तिळामध्ये सत्त्वलहरींचे (सकारत्मक  ऊर्जा ) ग्रहण अन् प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्यामुळे तीळगुळाचे सेवन केल्याने अंतर्शुद्धी होते. या दिवशी महादेवाला तीळ-तांदूळ अर्पण करण्याचे अथवा तीळतांदूळ मिश्रित अर्घ्य अर्पण करण्याचेही विधान आहे. या पर्वाच्या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व मानले गेले आहे. तिळाचे उटणे, तीळमिश्रित पाण्याचे स्नान, तीळमिश्रित पाणी पिणे, तिळाचे हवन करणे, स्वयंपाकात तिळाचा वापर, तसेच तिळाचे दान हे पूर्वीपासून महत्वाचे मानले जाते.या कृती केल्याने पापक्षालन होते.म्हणून या दिवशी तीळ, गूळ, तसेच साखरमिश्रित लाडू खाण्याचे, तसेच दान करण्याचे अपार महत्त्व आहे.

सण साजरा करण्याची पद्धत – ‘मकरसंक्रांतीला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ असतो. या काळात तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या नद्यांच्या काठी असलेल्या क्षेत्रावर स्नान करणार्‍यास महापुण्य लाभते.’ संक्रांतीच्या दुसर्‍या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते.या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले.

मकरसंक्रांतीला दिलेल्या दानाचे महत्त्व – मकरसंक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या पर्वकाळी केलेले दान आणि पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात. धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप, तसेच धार्मिक अनुष्ठान याला अत्यंत महत्त्व आहे असे सांगितले आहे.

हळदीकुंकू करण्याचे आध्यात्मिक महत्त्व – हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गादेवीचे अप्रकट तत्त्व जागृत होते अन् श्रद्धापूर्वक हळद-कुंकू लावणार्‍या जिवासाठी (व्यक्ती) कार्य करते. हळदीकुंकू करणे, म्हणजे एकप्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत (देवीकडून येणारी सकारात्मक स्पंदने) होण्यासाठी त्यांना आवाहन करणे. हळदीकुंकवाच्या माध्यमातून जीव एकप्रकारे दुसर्‍या जिवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो. हळदीकुंकू आणि वाण देणे आदी विधीतून जिवावर (व्यक्तीवर)  सगुण भक्तीचा संस्कार होण्यास, तसेच ईश्वराप्रती जिवाचा भक्ती भाव वाढण्यास साहाय्य होते.

 

वाण देण्याचे महत्त्ववाण कोणते द्यावे ? – ‘वाण देणे’ म्हणजे दुसर्‍या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांनी शरण जाणे. संक्रांतीचा काळ सर्वाना पोषक असतोच तसेच साधना करणाऱ्यांना विशेष पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणामुळे देवतेची कृपा होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते. सध्या च्या काळात प्लास्टिक-वस्तू, स्टीलची भांडी आदी व्यावहारिक वस्तूंचे वाण दिल्यामुळे वाण घेणार्‍या अन् देणार्‍या अशा दोन्ही व्यक्तींमध्ये देवाण घेवाण संबंध (हिशोब) निर्माण होतो. अधार्मिक वस्तूंचे वाण देण्याची चुकीची प्रथा सुरु आहे. खरेतर या वस्तूंपेक्षा सौभाग्याच्या वस्तू, उदबत्ती, उटणे, धार्मिक ग्रंथ, पोथ्या, देवतांची चित्रे, अध्यात्मविषयकध्वनीचित्र-चकत्या इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तूंचे वाण  द्यायला हवे. सात्त्विक वाण दिल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधले जाऊन दोन्ही व्यक्तींना चैतन्य मिळते. त्यामुळे ईश्वरीकृपा होते.

संकलन – प्रा. विठ्ठल जाधव  7038713883
संदर्भ – सनातन निर्मित ग्रंथ  ‘सण,  धार्मिक उत्सव आणि व्रते,

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.