Chakan : प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या दोन कंपन्यांवर छापे

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची कारवाई; रात्री उशिरापर्यंत प्लास्टिकची मोजदाद 

एमपीसी न्यूज – प्लास्टिक व थर्माकोलवर पूर्ण बंदी घालण्यात आल्यानंतर प्लास्टिकची उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्यांवर तातडीने धाडी टाकून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देणारे राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शनिवारी (दि.२०) चक्क चाकण औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांवर स्वतः धाडी घातल्याने प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची पाचावर धारण बसली आहे.

मालवाहू वाहनातून प्लास्टिक घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकास पर्यावरण मंत्र्यांनी हटकल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला आहे. रात्री उशिरापर्यंत चाकण एमआयडीसीमध्ये खुद्द पर्यावरण मंत्री आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल विभाग, चाकण पोलीस यांच्याकडून संयुक्तपणे प्लास्टिकच्या कच्च्या व पक्क्या मालाची मोजदाद  व कारवाई सुरु होती. 

चाकण औद्योगिक वसाहतीतील प्लास्टिक पॅकेजिंगसाठी प्लास्टिक बबल्स शीट्सचे व अन्य प्लास्टिक मालाचे उत्पादन करणारी खराबवाडी (ता.खेड) येथील आगरवाल पॅकेजिंग कंपनी व चाकण जवळील कुरुळी (ता. खेड) हद्दीतील मिताली पॅकेजिंग प्रा.लि. या दोन कंपन्यांवर राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी छापा मारला. या दोन्ही कंपन्यांमध्ये लाखो रुपये किमतीचा मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा उत्पादित पक्का व कच्चा माल मिळून आल्यानंतर याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांसह महसूल, एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली.  

याबाबतचे अधिक वृत्त असे की, शनिवारी (दि.२०) दुपारी शिर्डीकडे जात असताना खराबवाडी जवळ एक टेम्पो प्लास्टिक घेऊन चाललेला दिसल्याने पर्यावरण मंत्री कदम यांनी त्यास याबाबत विचारले.  त्यानंतर संबंधित चालकाने टेम्पोतील प्लास्टिक आगरवाल पॅकेजिंग कंपनीत नेत असल्याचे सांगितले. त्यानंतर मंत्री कदम यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर थेट कंपनीवर छापा मारला. रात्री उशिरा पर्यंत संबंधित कंपनीत प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत होती. महसूल प्रशासनासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अगरवाल पॅकेजिंग कंपनीतील चारही गोदामातील प्लास्टिक मालाची मोजदाद रात्री उशिरापर्यंत सुरु होती. 


अगरवाल पॅकेजिंग कंपनीचे व्यवस्थापक मनोज बन्सल यांनी सांगितले की, कंपनीत प्लास्टिकचे  पॅकेजिंगसाठी लागणारे बबल्स शीट्स व अन्य प्लास्टिक उत्पादन होत असून याबाबतच्या परवानग्या एमपीसीबीकडून घेण्यात आलेल्या आहेत, मंत्री रामदास कदम यांनी प्लास्टिक बंदीची अधिसूचना शासनाने काढल्यानंतर कंपनीने घेतलेले परवाने मागितले असल्याचेही मनोज बन्सल यांनी सांगितले.    
पर्यावरण मंत्री आक्रमक  

राज्यात प्लास्टिक बंदी केल्यानंतर प्लास्टिकची उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्यांवर तातडीने धाडी टाकून गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी त्याचवेळी मंत्रालयात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले होते. त्याचप्रमाणे रस्त्यावर उतरून त्यांनी स्वतः अनेक ठिकाणी प्लास्टिक वापराबाबत कारवाई केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर प्लास्टिक उत्पादक आणि वितरकांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते. त्यातूनच चाकणमधील प्लास्टिक उत्पादक कारखानेही त्यांच्या रडारवर आले आहेत. त्यामुळेच रात्री उशिरापर्यंत पर्यावरण मंत्री कारवाईच्या ठिकाणी स्वतः थांबून होते. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.