Chinchwad Water Supply News: मोहननगर, रामनगर, महात्मा फुले नगरमधील पाणीपुरवठा सुरळीत करा – मीनल यादव

एमपीसी न्यूज – गेल्या अनेक दिवसांपासून मोहननगर, रामनगर, महात्मा फुलेनगर या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. कमी दाबाने, अवेळी पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. अशा अधिका-यांवर कारवाई करुन या भागातील पाणीपुरवठा सुरळित करावा, अशी मागणी शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात नगरसेविका मीनल यादव यांनी म्हटले आहे की, मोहननगर, रामनगर, महात्मा फुलेनगर या परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अतिशय कमी प्रमाणात, कमी दाबाने पाणी येत आहे. अनेक ठिकाणी दोन ते तीन तास पाणीपुरवठा असून सुद्धा व्यवस्थित पाणी येत नाही.

पवना धरण शंभर टक्के भरलेले असताना अनेक नागरिकांची दररोज पाणी सोडण्याची मागणी होत आहे. तरीही पालिका प्रशासन दिवसाआडच पाणीपुरवठा करत आहे. पण एकदिवसीय सुद्धा पुरेसे, मुबलक पाणी दिले जात नाही. अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांना फोन केला असता ,” आमच्या घरात रेंज नाही, माझा तो प्रभाग राहिला नाही. आमच्या बदल्या झाल्यात,” अशी उडवाउडवीची उत्तरे मिळतात. या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. पाणीपुरवठा पूर्ण दाबाने व सुरळीत करून देण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका यादव यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.