New Delhi: देशात 24 तासांत 3561 नवे रुग्ण तर 1084 रुग्णांनी केली कोरोनावर मात

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या 3,561 नव्या रुग्णांची नोंद झाली तर याच काळात 1,084 कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशातील आतापर्यंतची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 हजार 952 झाली आहे. त्यापैकी 15 हजार 266 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 1,783 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आज (गुरुवारी) देण्यात आली.

भारतातील कोरोना मृत्यूदर 3.3 टक्के असून कोरोनामुक्तीचा दर 28.83 टक्के आहे, ही बाब भारताची परिस्थिती जगातील इतर देशांच्या तुलनेत चांगली असल्याचे दर्शविते, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.

देशात कोरोनाचे एकूण 35 हजार 902 सक्रिय रुग्ण असून ते विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यापैकी 4.8 टक्के रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 1.1 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर 3.3 टक्के रुग्णांना प्राणवायू द्यावा लागत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

देशातील कोरोना निदान चाचण्यांची क्षमता वाढली असून आता दिवसाला 95 हजार चाचण्या होऊ शकतात. आतापर्यंत देशात एकूण 13 लाख 57 हजार 442 कोरोना चाचण्या झाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

आजपर्यंत 180 जिल्ह्यांमध्ये मागील 7 दिवसांत कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही, 180 जिल्ह्यांत 7 ते 13 दिवसांत कोरोनाचे नवीन प्रकरण नाही, 164 जिल्ह्यांमध्ये 14 ते 20 दिवसांत नवीन प्रकरण आलेले नाही आणि 136 जिल्ह्यात मागील 21 ते 28 दिवसांत एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज उत्तर प्रदेश आणि ओडिशाच्या आरोग्य मंत्री आणि राज्यांतील कोविड -19 च्या व्यवस्थापनाची तयारी, परिस्थिती व कायदेशीर कारवाईचा आढावा घेण्यासाठी केंद्र आणि या दोन्ही राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत  बैठक घेतली. येणाऱ्या काही दिवसांत स्थलांतरित कामगारांची संख्या वाढून ती राज्यांपर्यंत पोहचणे अपेक्षित आहे. त्यांच्या चाचणीसाठी कठोर धोरण आणि यंत्रणा आखणे आवश्यक आहे, असे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.

विलगीकरणात ठेवणे आणि कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार, गरज पडल्यास त्यांची चाचणी, संस्थात्मक विलगीकरण आणि उपचार यासाठी प्रभावी रणनीतीही तयार करण्याची आवश्यकता आहे. 1075 या व्यतिरिक्त 104 हा हेल्पलाईन क्रमांक अनिवार्य नसलेल्या सेवांबाबत तक्रार निवारणासाठी आणि माहितीसाठी तसेच या सेवांच्या उपलब्धतेबाबत राज्यांना वापरता येईल. कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजार रोखण्यासाठी देखील पुरेसे उपाय करणे आवश्यक आहे, असा सल्ला त्यांना देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.