IPL 2021 : बातमी आयपीएलची – रोमहर्षक सामन्यात बंगलोरने दिल्लीवर मिळवला एक धावेने चित्तथरारक विजय

डीविलीयर्स ठरला विजयाचा शिल्पकार.

एमपीसी न्यूज : ( विवेक दिगंबरराव कुलकर्णी) जगभरात कोरोनाने हाहाकार माजवलेला असताना आयपीएलवर सुद्धा कदाचित मधेच स्पर्धा बंद पडण्याची अफवा/शंका घेतली जात आहे,परदेशी खेळाडू द्विधा मनस्थितीत आहेत असेही म्हटले जातेय,

या सर्वांना मागे सोडून आज एका परदेशी फक्त आहे म्हणून, अन्यथा भारतातल्या प्रत्येक सच्चा क्रिकेट रसिकांच्या लाडक्या डीविलीयर्सचे वादळ आज अहमदाबाद येथे घोंगावले ज्याने दिल्लीच्या नवख्या कर्णधाराच्या एका अंतिम क्षणी घेतलेल्या निर्णयाला सम्पूर्णपणे चुकीचे ठरवले आणि शेवटच्या षटकात तुफानी हल्ला करत 23 धावा काढल्या ज्या बंगलोरला विजयाजवळ घेऊनच गेल्या.

रिषभ पंतने नाणेफेक जिंकून बंगलोरला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आणि सुरुवातही कोहली व पडीकलला लवकरच बाद करत आपला निर्णय योग्यच होता हेच जणू सिद्ध केले.मात्र यानंतर ग्लेन मॅक्सवेल व रजत पटीदारने डाव सावरला खरा, पण मॅक्सवेल वैयक्तिक 25 धावावर बाद झाला आणि मग मैदानात आला ए बी डीविलीयर्स.

तो येतो तो खेळतो आणि तो विरोधी संघाची गोलंदाजी विस्कळीत करतो हेच जणू त्याने आज पुन्हा एकदा सिद्ध केले. 54 धावांची भागीदारी केल्यानंतर रजत बाद झाला तेंव्हा पाच षटके बाकी होती आणि धावसंख्या होती 114 मागच्या दोन दिवसांपासून वाढलेला उकाडा त्रस्त करत असताना नरेंद्र मोदी स्टेडियमवर या शेवटच्या पाच षटकात आले एक वादळ, ज्यात दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाचीचा पालापाचोळा झाला.

बऱ्यापैकी सुस्थितीत दिल्ली गोलंदाजी दिसत असताना एबीने बघताबघता आपला दमखम दाखवताना हल्ला सूरु केला आणि आपले अर्धशतक पूर्ण केले,त्याच्या या हल्ल्याने पंत गोंधळला आणि त्याने अंतिम षटकात आयपीएलमधे सर्वात जास्त बळी मिळवणाऱ्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमित मिश्राला विसरून मार्कस स्टोयनिसला गोलंदाजी दिली आणि …

एबीने स्टोयनिसचा जबरदस्त समाचार घेत 23 धावा चोपल्या आणि आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान 5000 धावा त्याही केवळ 3288 चेंडूत करून एक विक्रमही नावावर केला. 42 चेंडूत नाबाद 75 धावा ज्यात 5 षटकार आणि  तीन चौकार  सामील होते. दिल्ली कॅपिटल्सच्या वतीने या स्पर्धेतला पहिला सामना खेळणाऱ्या इशांत शर्माने अचुक गोलंदाजी केली. स्टोयनिसचे ते षटक सोडले तर दिल्लीच्या सर्वच बोलर्सने चांगले  प्रदर्शन केले.

172 धावांचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने सलामीलाच निराश केले.28 धावा धावफलकावर असताना धवन आणि स्टिव्हन स्मिथ बाद झाले आणि थोड्याच वेळात पृथ्वी शॉ सुद्धा संघाच्या 47 धावा झालेल्या असताना वैयक्तिक 21 धावावर बाद झाला.

यानंतर रिषभ पंत आणि महागडा ठरलेल्या स्टोयनिसने गोलंदाजीतले अपयश भरून काढण्याच्या दृष्टीने आक्रमक छोटी खेळी करताना 17 चेंडूतच 22 धावा केल्या पण तो याच आक्रमकतेच्या नादात हर्षल पटेलचा शिकार झाला.

92 वर चार गडी बाद अशी बिकट अवस्था असताना कर्णधार पंतला साथ देण्यासाठी मैदानावर आला वादळाच्या रुपातील सिमरोन हेटमायर.ज्याने शब्दशः  वादळी फलंदाजी सुरू केली.त्याची आक्रमक फलंदाजी बघताना पंत सुद्धा दिगमूढ झाला होता.

केवळ 25 चेंडूतच चार उत्तुंग षटकार मारत त्याने नाबाद 55 धावा केल्या पण सिराजने शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 15 धावा हव्या असताना पहिल्या तीन चेंडूवर जबरदस्त यॉर्कर्स टाकत पंत आणि हेटमायरला बांधून ठेवले आणि संघाला एका धावेने विजयी करून दिले.आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या रिषभ पंतने आजही अर्धशतकी खेळी केली खरी पण त्यासाठी त्याने 46 चेंडू घेतले,जे विजयापर्यन्त घेऊन जावू शकले नाहीत,कदाचित त्याला हे सत्य उमजल्यानेच पंतचा चेहरा निराश झालेला स्पष्ट दिसत होता.

बेंगलोर संघाला हा विजय पुन्हा एकदा अंकतालिकेत प्रथम स्थानावर स्थानापंन करून गेला. आपल्या चाहत्यांना आनंदी करणारी खे आणि संघाला विजयी करणारी खेळी करणारा एबी डीविलीयर्सच सर्वार्थाने सामनावीर म्हणून गौरवण्यात  आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.