IPL 2021: बातमी आयपीएलची – उत्कंठावर्धक सामन्यात दिल्लीने अखेरच्या चेंडूवर सुपर ओव्हरमध्ये मिळवला विजय

एक अपुरी धाव ठरली पराभवाला कारणीभूत.

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) – कालच्या रविवारी डबल धमाका होता, पहिल्या सामन्यात चेन्नई किंग्जने रॉयल चॅलेंजर बंगलोर संघाला एकतर्फी पराभूत केले तर चेन्नई येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात अटीतटीच्या लढतीत या स्पर्धेतला पहिला टाय सामना आणि सुपर ओव्हर बघायला मिळाले.

सनरायजर्स हैदराबादला जिंकण्यासाठी हव्या होत्या सोळा धावा, आणि हातात विकेट्स शिल्लक होत्या तीनच,त्यात समोर होता जगातला वेगवान आणि मागच्या कित्येक वर्षांपासून सातत्यपूर्वक चांगली कामगिरी करणारा कगीसो रबाडा,ज्याचे यॉर्कर्स, अचुकता,जगभरातल्या क्रिकेट विश्वात नावाजली जाते,आणि याच्यापुढे उभे कोण तर विल्यम्सन आणि नवोदित सुचित.

काय होईल?कोण जिंकेल? उत्कंठा ,रक्तदाब वाढवणारी गोष्ट क्रिकेट रसिकांना नवीन नाहीच पण तरीही या प्रकारातुन जायचे म्हणले की खऱ्या रसिकाला जेव्हढा आनंद मिळतो तो कशातच नाही.

अपेक्षित रोमांच ,उत्कंठा अनुभवत आणि प्रचंड मोठे दडपण घेत रबाडाने  हे अखेरचे षटक एक षटकार आणि एक चौकार खात फेकले खरे पण त्याने संघाला किमान पराभूत तरी होऊ दिले नाही आणि पंधरा धावा निघाल्याने सामना टाय झाला. होय यावर्षीच्या स्पर्धेतला हा पहिला टाय सामना ज्यामध्ये सुपर ओव्हर टाकले गेले आणि सनरायजर्सच्या सलामीच्या फलंदाजाने काढलेल्या एका शॉर्ट धावेमुळे दिल्लीला सुद्ध अखेरच्या चेंडूवर विजय मिळाला.

पण हा विजय बघेपर्यंत प्रत्येक जण क्रिकेटचा खराखुरा रोमांच अनुभवत होता. रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि पृथ्वी शॉ व शिखर धवनने धडाकेबाज सुरुवात करताना सनरायजर्सच्या गोलंदाजावर तुफानी हल्ला करत चांगली सुरुवात करून दिली. पहिल्याच षटकात पृथ्वीने लागोपाठ तीन चौकार मारत आपले इरादे स्पष्ट केले.

षटकामागे 8 धावांची सरासरी ठेवत या जोडीने दहा षटकातच 81 धावा चोपल्या.पृथ्वी शॉ फारच सुंदर खेळत होता.मात्र अर्धशतकी खेळी करून तो धावबाद झाला. यानंतर आलेल्या रिषभ पंत, स्मिथ यांनी बऱ्यापैकी फलंदाजी करत संघाची धावसंख्या  159 पर्यन्त पोहचवली.

खरे तर इतक्या चांगल्या सुरुवातीनंतर 180 ते 190 धावा होतील असे वाटत असतानाच सनरायजर्सच्या गोलंदाजानी दिल्लीच्या संघाला 159धावात रोखून चांगली कामगिरी केली होती.मात्र फलंदाजाने आपला वाटा न उचलल्याने संघाच्या हातातोंडाशी आलेला विजय मात्र पराभवात बदलला.

160 धावांचा पाठलाग करताना कर्णधार डेविड वॉर्नर मात्र खूप स्वस्तात बाद झाल्यानंतर जॉनी बेअर स्टो आणि केन विल्यम्सने चांगली फलंदाजी करत डाव सावरला खरा,पण एकापाठोपाठ एक विकेट्स दुसऱ्या बाजूने पडत गेल्या. केन विल्यम्सने मात्र अखेरपर्यंत किल्ला लढवताना नवोदित सूचितच्या साथीने संघाला विजयाची अंधुकशी का होईना पण आशा दाखवली.

एकवेळ तर दिल्ली सहज जिंकेल असे वाटत असतानाच सूचितने जबरदस्त टोलेबाजी करत विजय खेचन्याचा प्रयत्न केला,पण त्याला रबाडाचा अनुभव भारी ठरला आणि परिणामी दोन्ही संघाच्या धावसंख्या 159 च म्हणजे टाय झाल्या.

आणि मग सुरू झाले सुपर ओव्हर, ज्यात अक्षर पटेलने अचूक गोलंदाजी करताना केवळ आठच धावा केल्या त्यातही एक धाव शॉर्ट पडल्याने दिल्लीला 9 ऐवजी  आठच धावा करायच्या होत्या.ज्या त्यांनी रशीद खानच्या सुपर गोलंदाजीपुढे शेवटच्या चेंडूपर्यत खेळून विजय मिळवला.

या विजयामुळे पंतचा दिल्ली संघ अंकतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आला तर हातातोंडाशी आलेला विजय निसटल्याने हैदराबाद चा सन आज तरी राईज होण्याआधीच मावळला. आक्रमक अर्धशतकी खेळी करणारा पृथ्वी शॉ सामनावीर ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.