Pune News : चेन्नई एक्सप्रेसमध्येच प्रवासी महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म

एमपीसी न्यूज – मुंबई-चेन्नई एक्सप्रेस या रेल्वे गाडीमध्ये एका प्रवासी महिलेने बाळाला जन्म दिला. रेल्वे विभागाच्या तत्पर सहकार्यामुळे प्रवासी महिला आणि तिचे बाळ दोघेही सुखरूप आहेत.

मंगळवारी (दि. 18) रात्री उशिरा मुंबई-चेन्नई एक्सप्रेस पुणे रेल्वे स्थानकावर आली. या गाडीने एक गरोदर महिला प्रवास करत होती. पुणे स्थानकावरून रेल्वे सुटली आणि महिलेला प्रसुतीपूर्व वेदना सुरु झाल्या. तिकीट निरीक्षक शैलेश कुमार यांनी रेल्वेच्या कंट्रोलला माहिती दिली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखत रेल्वे विभाग कामाला लागला.

पुण्यातील रेल्वे कंट्रोल ऑफिसमधील मोहन मुल्या, अजय आनंद, आर जी मीना आणि एस जी धुळे यांनी लोणी काळभोर रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर आर पी सिंह यांना संपर्क केला आणि घटनेची माहिती दिली. रेल्वे लोणी काळभोर येथे थांबवण्याच्या सूचना देत पूर्ण वैद्यकीय तयार ठेवण्यास सांगितले.

स्टेशन मास्तर आर पी सिंह यांनी देखील लोणी काळभोर रेल्वे स्थानकावर चेन्नई एक्सप्रेस येईपर्यंत डॉक्टरांची टीम तयार केली. गाडी रेल्वे स्थानकावर येताच डॉक्टरांनी रेल्वे कोचमध्येच आवश्यक प्राथमिक मदत केली. प्रवासी महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर चेन्नई एक्सप्रेस नुकतीच आई झालेली प्रवासी महिला आणि तिच्या बाळासह पुढील प्रवासाला निघाली.

रेल्वे विभागाने तात्काळ केलेल्या या मदतीमुळे प्रवासी महिलेला योग्य वेळी वैद्यकीय मदत मिळू शकली. याबद्दल विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा, अपर विभागीय व्यवस्थापक नीलम चंद्रा आणि त्यांच्या टीमचे प्रवाशांनी कौतुक केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.