Bhosari: पत्नीने घरखर्चाला पैसे मागितले, पतीने केला आत्महत्येचा प्रयत्न

In Bhosari Pimpri Chinchwad, a painter tried to commit suicide due to financial problem

एमपीसी न्यूज: लॉकडाऊनमुळे आलेली आर्थिक अडचण तसेच घरखर्चाला पत्नीने पैसे मागितल्याने झालेल्या किरकोळ भांडणातून रंगकाम करणाऱ्या एका पेंटरने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री भोसरी येथे घडली आहे. वेळीच शेजाऱ्यांनी तत्परता दाखवत आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले.

प्रवीण गुलाबराव शेलार (वय 42, रा. संत तुकाराम नगर, आळंदी रोड, भोसरी) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे रंगकाम करणाऱ्या प्रवीण शेलार यांच्याकडे कोणतेच काम नव्हते. त्यामुळे घरात आर्थिक चणचण भासत होती. रविवारी रात्री पत्नीने प्रवीण यांच्याकडे घरखर्चाला पैसे मागितले होते. यावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला.

वादानंतर प्रवीण यांच्या पत्नी शेजारी राहणाऱ्या आपल्या जावेकडे गेल्या. त्यावेळी प्रवीण यांची दोन्ही मुले बाहेर अंगणात खेळत होती. प्रवीणने दरवाजा लावून घेतल्याचा आवाज ऐकून पत्नी घरी आली. पत्नीने दरवाजा वाजवला मात्र आतून पतीने काहीच प्रतिसाद दिला नाही. यावेळी प्रवीण यांचा भाऊ आणि शेजारचे नागरिक जमा झाले. पत्नीने खिडकीची काच फोडून आत पाहिले असता प्रवीण यांनी गळफास घेतल्याचे दिसले. यामुळे नागरिकांनी तात्काळ दरवाजा तोडून प्रवीण यांना त्वरीत खाली उतरवले.

प्रवीण यांना पिंपरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ते सध्या बेशुद्धावस्थेत आहेत. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like