Dehuroad : देहूगावात अज्ञातांनी कपड्याचे आणि केकचे दुकान फोडले

एमपीसी न्यूज – देहूगावात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी कपड्याचे आणि केकच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. 28) रात्री आठ ते रविवारी (दि. 29) सकाळी नऊ या कालावधीत घडली.

राजाराम ज्ञानेश्वर बालघरे (वय 55, रा. चिंचोली, ता. हवेली) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बालघरे यांचे देहूगावात कुलवधू मॅचिंग सेंटर नावाचे कपड्यांचे दुकान आहे. रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील वस्तू अस्ताव्यस्त केल्या. दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला.

तसेच बालघरे यांच्या दुकानाच्या बाजूला संतोष धोंडिबा बालघरे यांचे केकीज द केक शॉप हे दुकान आहे. चोरट्यांनी केक शॉपचे देखील शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही दुकानांमधून काहीही चोरीला गेले नसून दुकानाचे शटर उचकटून केवळ चोरीचा प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.