IPL 2021: बातमी आयपीएलची – दिल्लीत घोंगावले पोलार्डरुपी तुफानी वादळ, चेन्नईचा झाला पालापाचोळा

0

एमपीसी न्यूज : (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर झालेल्या आजच्या मुंबई इंडीयन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन बलाढ्य संघात झालेल्या अत्यंत रोमांचकारक आणि थरारक सामन्यात मुंबईने चेन्नई संघाला एकट्या पोलार्डच्या जिवावर सात विकेट्सने पराभूत करत चेन्नईवर आपल्या विजयचा वरचष्मा कायम राखला.

पुराणकथेत आपण हनुमानाने एका रात्रीत द्रोणागिरी पर्वत उचलून आणून लक्ष्मणाला संजीवनी देऊन जीवदान दिले ही कथा कित्येकदा ऐकलेली आहे यात सत्य असत्य या खोलात आपल्याला जायचे नसले तरी अशक्य ते शक्य हनुमानाने केले होते इतकेच ध्यानात घेऊ.

तसेच अशक्य ते शक्य आज कायरन पोलार्डने करून पराभवाच्या गर्तेत असलेल्या मुंबई संघाला विजयाची संजीवनी नक्कीच दिली असे म्हणता येईल. डोळ्यासमोर असलेले मोठे लक्ष, त्यात पडलेल्या विकेट्स, समोर जगातील सर्वात धुर्त आणि यशस्वी कर्णधार अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीत भीमकाय पोलार्डने जबरदस्त फलंदाजी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला.

त्याने घातलेल्या थैमानामुळे तो यापुढे कित्येकदा चेन्नई संघाच्या गोलंदाजांच्या स्वप्नात येत राहील, यात काही शंकाच  नाही. डूप्लेशीचे लागोपाठ चौथे अर्धशतक,रायडूचा झंझावात, सॅम करनची उत्कृष्ट गोलंदाजी हा सर्वाचा विसर पाडणारी कामगिरी करत पोलार्डने आज मुंबई संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

प्रथम नाणेफेक जिंकून रोहीत शर्माने चेन्नई संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं.

आज मात्र ऋतुराज गायकवाड काहीही खास कामगीरी करू शकला नाही आणि केवळ चार धावा काढून बोल्टचा शिकार झाला. यानंतर पून्हा एकदा धोनीने मोईन अलीला सुरेश रैनाच्या आधी फलंदाजीत बढती दिली, ज्याचा अचूक फायदा घेत मोईनने तुफानी फलंदाजी करत अवघ्या 36 चेंडूत 58 धावा करताना 5 षटकार आणि पाच चौकार मारत  दुसऱ्या गडयासाठी 108 धावांची भागीदारी केली.

_MPC_DIR_MPU_II

मात्र तो बाद झाल्यानंतर आलेला सुरेश रैना केवळ दोनच धावा काढून बाद झा..ला.मात्र तो बाद झाला याचा आंनद चेन्नई समर्थकाना वाटावा अशी खेळी त्याच्या जागी आलेल्या अंबाती रायडूने करत संघाला 218 ही मोठी धावसंख्या गाठून दिली. 277 च्या strike रेटने रायडूने फक्त 27 चेंडूत नाबाद 72 धावा करताना 7 षटकार आणि केवळ चारच चौकार मारले.

या स्फोटक फलंदाजीमुळे मुंबईच्या सर्वच गोलंदाज निष्प्रभ आणि महागडे ठरले ,इथेही चमत्कार केला तो पोलार्डनेच. त्याने फक्त 12 धावा देत दोन बळी मिळवले. आजपर्यंत मुंबई आणि चेन्नई दरम्यानच्या 8 सामन्यात मुंबई इंडीयन्स संघाने सहा वेळा बाजी मारलेली असल्याने त्यांचा आत्मविश्वास तसा बुलंद होताच,मात्र आजतागायत एव्हडे मोठे आव्हान मुंबईला चेन्नईने दिले नव्हते,

त्यामुळे चेन्नई संघ सुध्दा विजयाचे मांडे मनात खात होता,मात्र रोहित आणि डीकॉकने चांगली सुरुवात करून देताना सात षटकात 71 धावा दहा धावा एका षटकामागे या सरासरीने ठोकल्या पण जम बसलेला रोहीत आणि भरवशाच्या सुर्यकुमार लागोपाठ बाद झाले आणि चेन्नई संघाला विजय खुणावू लागला.पण पाच वेळा ही स्पर्धा जिंकलेला रोहीत सुद्धा काही कमी नाही,

त्याने आज सुद्धा पोलार्ड आणि हार्दिकच्या आधी कृनालला बढती दिली आणि आज गोलंदाजी  न करु शकलेल्या कृनालने ती कसर भरून काढत चांगली फलंदाजी करत पोलार्डला उत्तम साथ दिली,भलेही त्याने 23 चेंडूत 32च धावा काढल्या पण त्याने पोलार्ड बरोबर पाऊणशतकी भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ आणले.सॅम करनच्या एका उत्कृष्ट यॉर्करवर तो पायचीत झाल्यानंतर त्याच्या धाकट्या भावाने छोटीच पण  आक्रमक पारी खेळताना सात चेंडूत 16 धावा केल्या,

तो जरी डूप्लेशीने घेतलेल्या एका उत्कृष्ट झेलामुळे बाद झाला तरी याच डूप्लेसीने पोलार्डचा सोपा झेल सोडला जो चेन्नईला फारच महागडा पडला.पंड्या बाद झाल्यानंतर जराही विचलित न होता पोलार्डने लुंगी एंगीडीवर हल्ला करत संघाला एक अविश्वसनीय आणि थरारक विजय मिळवून दिला.पोलार्डने 8 षटकार  आणि सहा चौकार मारत नाबाद 87 धावा केल्या तर केवळ 17 चेंडूतच त्याने अर्धशतक ठोकून दोन दिवसांपूर्वी केलेला पृथ्वी शॉच्या वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाला मागे टाकले.

धोनीची धुर्त कप्तानी, सॅम करनची उत्कृष्ट गोलंदाजी या सर्वांना आज एकटया पोलार्डने एकहाती पराभूत करत मुंबई संघाला मोठया विजयाबरोबरच मोठा आत्मविश्वास आणि अंक तालिकेत तिसऱ्या स्थानावर सुध्दा विराजमान केले.साहजिकच आजच्या  विजयाचा मानकरी सामन्याचा मानकरी ठरला नसता तरच नवल.पोलार्डची आजची खेळी आयपीएलच्या इतिहासात सोनेरी अक्षरात यापुढे नक्कीच नोंदवली जाईल, फुल पैसा वसुल खेळी, वेलडन पोलार्ड

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment