Hinjawadi : उच्चभ्रू सोसायटीत ‘तो’ दिवसा धुवायचा गाड्या अन रात्री करायचा चोरी

गुन्हे शाखा युनिट चारकडून चोरट्याला अटक; पाच लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – ज्या सोसायटीमध्ये दिवसभर हाऊसकिपींग आणि गाड्या धुण्याचे काम करायचा. त्याच सोसायटीमध्ये रात्रीच्या वेळी घरफोडी करायचा. या चोरट्याला गुन्हे शाखा युनिट चारने अटक केली आहे. त्याच्याकडून 4 लाख 91 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

विकास गौतम सरोदे (वय 24, रा. कोळवण, ता. मुळशी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज तीन आणि परिसरात घरफोडी चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस तपास करीत होते. ज्या सोसायट्यांमध्ये चोऱ्या झाल्या आहेत. त्या सोसायट्यांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले. त्यावेळी मेगापॉलीस या सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये जो तरुण दिवसभर सोसायटीमध्ये काम करतो. तोच रात्री चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस शिपाई जायभाये, सहाय्यक पोलीस फौजदार वासुदेव मुंढे यांना माहिती मिळाली की, हा चोरटा मेगापॉलीस सोसायटीजवळ असलेल्या चौकात थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून विकास याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हिंजवडी परिसरात सात ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले. त्यावरून त्याला अटक केली आहे.

आरोपी विकास हिंजवडी फेज तीन मधील मेगापॉलीस या उच्चभ्रू सोसायटीमध्ये हाऊसकिपींग आणि गाड्या धुण्याचे काम करायचा. तो सोसायटीमध्ये रात्री उशिरापर्यंत थांबायचा. ज्या फ्लॅटच्या मालकाची गाडी पार्किंगमध्ये नाही, त्या मालकाच्या फ्लॅटमध्ये खिडकीतून आत जात असे. तसेच काही वेळेला गाडी धुण्यासाठी गाडीच्या चावीसोबत असलेल्या फ्लॅटची चावी काढून घेऊन देखील फ्लॅटमध्ये दरवाजातून प्रवेश करीत असे.

त्याने मेगापॉलीस येथील सांग्रीया व मिस्ट्रीक येथील वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये सात फ्लॅटमध्ये चोरी केल्याचे सांगितले. विकास याला पौड पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक देखील केली होती. पोलिसांनी त्याच्याकडून 4 लाख 91 हजार 200 रुपये किमतीचे 145 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे. या कारवाईमुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी नारायण जाधव, धर्मराज आवटे, संजय गवारे, वासुदेव मुंढे, सुरेश जायभाये, आदिनाथ मिसाळ, लक्ष्मण आढारी, सुनील गुट्टे, गोविंद चव्हाण, तुषार काळे, धनाजी शिंदे, अजिनाथ ओंबासे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.