Hinjawadi : आयटी पार्क असलेल्या हिंजवडीत सरपंच निवडीवरून मंडल अधिकाऱ्यांसमोर राडा

एमपीसी न्यूज – आयटी पार्क म्हणून देशभर नावाजलेल्या (Hinjawadi) हिंजवडीमध्ये सरपंच निवडीवरून तुफान राडा झाला. सरपंच पदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज एका ग्रामपंचायत सदस्याने मंडळ अधिकाऱ्यांसमोर टराटरा फाडून टाकला. हा प्रकार सोमवारी (दि.25) हिंजवडी ग्रामपंचायत कार्यालयात घडला.
याप्रकरणी मंडल अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत नाईकवाडी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ग्रामपंचायत सदस्य मयूर राजेंद्र साखरे (रा. हिंजवडी) यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 353, 186 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नव्वदच्या दशकात हिंजवडी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आयटी पार्क बनवले. त्यानंतर हिंजवडीचा चेहरा मोहरा बदलून गेला. देशासह जगाची नजर आता हिंजवडीवर आहे.
असे असले तरी हिंजवडी अजूनही ग्रामपंचायतच आहे. त्यामुळे इथली राजकीय समीकरणे लगतची महानगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडपेक्षा काहीशी वेगळी आहेत. ग्रामपंचायच्या माध्यमातून इथला कारभार हाकला जात आहे.
Talegaon : ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या तळेगाव मधील गणेशोत्सवाची सांगता
हिंजवडी ग्रामपंचायत येथे सरपंच पदाच्या (Hinjawadi) निवडीची धामधूम सुरु आहे. सरपंच पदासाठी मयूर साखरे आणि गणेश बन्सीलाल जांभूळकर यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. सोमवारी मंडळ अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत नाईकवाडी यांच्या उपस्थितीत अर्ज छाननी सुरु होती.
साखरे यांनी जांभूळकर यांच्या अर्जावर हरकत घ्यायची असल्याचे सांगून त्यांचा सरपंच पदाचा उमेदवारी अर्ज घेतला आणि तो अर्ज फाडून टाकला. त्यानंतर तो अर्ज साखरे यांनी स्वतःकडे ठेऊन घेत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख यांनी सांगितले.