Pimpri News : महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी ‘स्पर्श’, दोषी पालिका अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा – सुरेश निकाळजे

एमपीसी न्यूज – स्पर्श हॉस्पिटलच्या संचालकासह महापालिकेच्या संबधित अधिकारी व कर्माचारी यांनी संगनमताने खोटी बिले सादर करून महापालिकेकडून 3 कोटी 28 लाख रुपये घेतल्याचा आरोप करत याप्रकरणी  संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी, आरपीआय (अ) चे शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे केली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना निकाळजे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरी येथे रामस्मृति मंगल कार्यालय व हिरा लोन्स याठिकाणी कोविड केअर सेंटर चालविण्याचा ठेका मनपा मार्फत फोर्च्युन स्पर्श हॉस्पिटलला देण्यात आलेला होता. सदर ठिकाणी एकही रुग्ण दाखल नसताना कोटी बिले सादर करून फोर्च्युन स्पर्श हॉस्पिटलने महापालिकेकडून 3 कोटी 28 लाख रुपये घेतले आहे.

या प्रकरणामध्ये महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याकडे शासनमान्य कोणतेही अधिकार नसताना ते या पदावर अधिकृतपणे पालिकेचा कारभार पाहत होते. त्यांनी या पदाचा गैरवापर करीत अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्याशी संगनमत करून स्थायी समितीची मान्यता न घेता बिले अदा केलेली आहेत ही महापालिकेची सर्वात मोठी लूट आहे.

या प्रकरणामध्ये स्पर्शच्या संचालक मंडळसह अनेक अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी निकाळजे यांनी  केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.