Pimpri: ‘स्थायी’ची जोरदार बॅटिंग; 213 कोटींचा कामांना मंजुरी

ऐनवेळच्या 12 विषयांचा समावेश;

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने कधीही आचारसंहिता लागू शकते, या भितीने आणि दीड महिन्याचा कार्यकाळ शिल्लक राहिल्याने स्थायी समितीच्या कोटीच्या कोटी उड्डाणांना आता सुरुवात झाली आहे. एक तहकूब आणि दुसरी नियमित अशा एकूण दोन साप्ताहिक बैठकांमध्ये 122 विषयांच्या 213 कोटी 72 लाखांच्या खर्चाला आज मंजुरी दिली. यामध्ये ऐनवेळच्या 12 विषयांचा समावेश आहे. त्यामध्ये च-होली, मोशीतील सर्वाधिक 43 कोटी रुपयांचा कामांचा सहभाग आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (मंगळवारी) पार पडली. सभापती ममता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. स्थायी समितीच्या आजच्या सभेत प्रभाग क्र. तीन मधील रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या सर्वाधिक खर्चाला मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 18 मीटर रस्ता विकसित करण्यासाठी 37 कोटी 33 लाख, तर याच प्रभागातील च-होली येथे स्मशानभूमी विकसित करण्यासाठी पाच कोटी 83 लाख रुपये खर्च अशा एकाच प्रभागासाठ 42 कोटी 66 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. रस्ता आणि स्मशानभूमीवगळता डुडुळगाव येथील प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीसाठी 44 लाख 92 हजार 459 रुपयाच्या खर्चालादेखील मान्यता देण्यात आली. त्याखालोखाल वायसीएम रुग्णालयासाठी वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यासाठी 24 कोटी 60 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे.

कचरा उचलण्यासाठी ठेकेदाराला चार महिने मुदत वाढवून देण्याच्या एक कोटी 40 लाख रुपये खर्चाला देखील मान्यता देण्यात आली. याशिवाय वेंगसरकर क्रिकेट ऍकॅडमीच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी 84 लाख रुपये, पिंपळे गुरव येथील जिजाऊ उद्यानाच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी 55 लाख रुपये, तर भीमसृष्टीचे काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी ऐनवेळी मांडलेल्या प्रस्तावानुसार 1 कोटी 24 लाखांची तरतुद करण्यात आली. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालय आणि इतर रुग्णालयातील प्रयोगशाळा तसेच रक्‍तपेढीकरिता लॅब केमीकल्स, किटस्‌ आणि डिस्सोजेबल साहित्य बाजारभावापेक्षा 18 टक्के कमी दराने मेसर्स माहेश्‍वरी सेल्स कॉर्पोरेशनकडून खरेदी कले जाणार आहे. याशिवाय रुग्णालायकरिता आवश्‍यक वैद्यकीय उपकरणे मोफत घेतली जाणार असून, त्यांच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी आवश्‍यक बाब म्हणून एकूण 24 कोटी 60 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

एक तहकूब आणि दुसरी नियमित अशा एकूण दोन स्थायी समिती बैठका मंगळवारी पार पडल्या. या बैठकांमध्ये भोसरी विभागासाठी सर्वाधिक खर्चाच्या निविदांना मान्यता देण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने 18 मीटर रस्ता दुरुस्तीच्या दोन कामांचा समावेश आहे. याशिवाय च-होलीतील स्मशान दुरुस्ती आणि डुडुळगाव येथील प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीच्या खर्चाचा समावेश आहे.

  • बहुचर्चित जिजाऊ उद्यानासाठी साडेतीन कोटी!
    चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पिंपळेगुरव येथील बहुचर्चित राजमाता जिजाऊ उद्यानच्या स्थापत्य आणि विद्युतविषयक कामांसाठी 3 कोटी 55 लाखांच्या खर्चास स्थायीने मान्यता दिली आहे. याशिवाय कचरा उचलण्याच्या कामालादेखील चार महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.