Chinchwad News : पिंपरी-चिंचवड शहरात वेगवेगळ्या चोऱ्यांचे आणखी 12 गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – शहरात चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. मंगळवारी (दि. 19) वाहनचोरीचे आठ, घरफोडी, जबरी चोरीचे चार असे एकूण 12 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

एमआयडीसी भोसरी, दिघी, वाकड, सांगवी परिसरातून प्रत्येकी एक अशा चार तर चाकण आणि चिखली मधून प्रत्येकी दोन अशा चार दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. घरासमोर पार्क केलेल्या, सोसायटीच्या पार्किंगमध्ये, दुकानासमोर, रस्त्याच्या बाजूला लावलेली वाहने चोरटे चोरून नेतात. वाहनांना लॉक लावलेले असेल तरीही नजर चुकवून लॉक तोडून वाहने चोरली जात आहेत.

आळंदी जवळ केळगाव येथे सुरु असलेल्या एका बांधकामावर स्लॅब टाकण्यासाठी सेंट्रिंगच्या प्लेट आणून ठेवल्या होत्या. चोरट्यांनी त्या 32 हजार 500 रुपयांच्या 50 सेंट्रिंगच्या प्लेट चोरून नेल्या आहेत. याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

वाकड येथे काळेवाडी फाटा ते तापकीर चौकाकडे जाणा-या रोडने एक व्यक्ती चालत जात होती. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्या व्यक्तीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून मारहाण करत 9 हजार 200 रुपयांचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडीमध्ये एक घरफोडीची घटना घडली आहे. कासारसाई येथील संत तुकाराम कारखान्याजवळ असलेल्या शिक्षक कॉलनीमध्ये अज्ञात चोरट्यांनी एक घर फोडले. घरातून 27 ग्रॅम सोन्याचे दागिने, आठ ग्रॅम चांदीचे दागिने, तीन हजारांची रोकड असा एकूण 59 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल कडी-कोयंडा वाकवून कुलूप तोडून चोरून नेला आहे.

खेड तालुक्यातील पाईट येथील विकी मॉल बिअर बारच्या खिडकीतून आत प्रवेश करत चोरट्यांनी 20 हजारांची रोकड आणि बिअरचे चार बॉक्स असा एकूण 47 हजार 532 रुपयांचा माल चोरून नेला आहे. चाकण पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील 12 घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी 3 लाख 20 हजार 732 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालणे हे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या समोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.