Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहरात एक महिन्यात 17 हजार 800 जणांवर विनाहेल्मेटची कारवाई

एमपीसी न्यूज – वाहतूक सुरक्षा अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेने वाहतूक जनजागृतीसह दंडात्मक कारवाईच्या मोहिमा देखील हाती घेतल्या आहेत. जानेवारी महिन्यात राबविलेल्या मोहिमेत वाहतूक पोलिसांनी तब्बल 17 हजार 806 वाहन चालकांवर हेल्मेट सक्तीची कारवाई केली आहे.

मागील महिनाभरात 17 हजार 806 जणांवर दंडात्मक कारवाई करून 89 लाख 3 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्यावर्षीय जानेवारी 2019 मध्ये एक हजार 53 जणांवर हेल्मेट न घातल्याने कारवाई केली होती. हेल्मेट न घातल्यास 500 रुपयांचा दंड आकारण्यात येतो.

शहरातून जाणाऱ्या प्रमुख महामार्गांवर अपघातांची संख्या अधिक

पिंपरी चिंचवड शहरातून पुणे नाशिक, पुणे मुंबई आणि मुंबई बंगलोर हे तीन प्रमुख महामार्ग जातात. या महामार्गावर रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघाताचे प्रमाण मोठे आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते प्रशस्त असल्याने वाहन चालक वाहने वेगात दामटतात. भरधाव वेगाने वाहने चालविल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढते. 2019 या वर्षात पिंपरी चिंचवड आयुक्‍तालयाच्या हद्दीत 319 प्राणांतिक अपघात झाले आहेत. तर 2020 मध्ये करोनामुळे लॉकडाऊन असल्याचे प्राणांतिक अपघातांचे प्रमाण थोडे कमी झाले आहे. गेल्या वर्षभरात 279 प्राणांतिक अपघातांची नोंद झाली आहे.

हेल्मेट न घातल्याने गेले प्राण

प्राणांतिक अपघातांमध्ये बळी गेलेल्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहेत. तसेच बळी गेलेल्यांमध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बहूतांश अपघातांमध्ये दुचाकीस्वाराने हेल्मेट न घातल्याने डोक्‍याला मार लागून मृत्यू झालेल्यांचे प्रमाण अधिक आहे. अपघातातील बळींचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कडक उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. यापूर्वी अनेकदा वाहतूकीच्या इतर नियमांचे उल्लंघन केल्यास काहीवेळाच हेल्मेटबाबत दंड आकारण्यात येत होता. आता मात्र सरसकट कारवाईला सुरवात केली आहे.

वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले म्हणाले, “दुचाकीस्वारांना दंड आकारणे हा आमचा हेतू नाही. वाहतुकीला शिस्त लागावी. अपघातातील बळींचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी हेल्मेट सक्‍ती लागू केली आहे. त्यातून प्राणांतिक अपघातांचे प्रमाण कमी हाईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.