Hadapsar : मोबाईल टॉवरच्या बॅट-या चोरणारी परप्रांतीय टोळी पोलिसांच्या ताब्यात

साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पुणे शहर  व परिसरातील मोबाईल टॉवरच्या बॅट-या चोरणारी टोळीला पोलिसांनी फुरसुंगी ओव्हर ब्रिजजवळ ताब्यात घेऊन तब्बल 10 लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

जुल्फेकार इब्रार खान (वय 25, रा. होळकरवाडी, हवेली), समशादखान इरफान जहीर खान(वय 19, रा. सोहनपूर, उत्तरप्रदेश) व रहेमतुल्लाह बरकतउल्लाह खान(वय 22, रा. कोयलाबासरोड, उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी मंगेश भांगे यांना गस्त घालत असताना मिळालेल्या बातमीनुसार,हडपसर पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी व कर्मचा-यांनी फुरसुंगी ओव्हर ब्रिजजवळ सापळा रचून संशयितरित्या फिरणा-या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी पुणे शहर व परिसरातील मोबाईल टॉवरच्या बॅट-या चोरल्या  असल्याचे कबूल केले.

आरोपींकडून एकूण 66 बॅट-या व एक टेम्पो व इंडिका गाडी असा तब्बल 10 लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.