Pune crime latest news : पुण्यात भररस्त्यात तलवारीने कापला केक

पोलिसांनी केलं एकाला अटक

एमपीसी न्यूज : भररस्त्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. पुण्याच्या मध्यवस्तीतील गणेश पेठ परिसरात हा प्रकार घडला. समीर अनंत ढमाले (वय २७, रा. लोणकर वाडा, गणेश पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक फटाक्यांची आतषबाजी केली जाते, रस्त्याच्या मधोमध केक कापून सेलिब्रेशन साजरे केले जाते. गल्लीबोळातील कथित भाईंकडून असे प्रकार वारंवार केले जातात. दरम्यान अशाप्रकारे वाढदिवस साजरे केले जाऊ नये यासाठी पोलिसांकडून वारंवार बजावण्यात देखील आले आहे. तरीदेखील सर्रास याकडे दुर्लक्ष केले जाते.

असाच एक प्रकार पुण्याच्या मध्यवस्तीत असणाऱ्या गणेश पेठेत घडला होता. भररस्त्यात तलवारीने केक कापून एका भाईचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याची माहिती काढून ढमालेला गणेश पेठेतून अटक केली. त्यांच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.